पालघर : शिवसेनेची लोकसभेत आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका आहे. शिवसेनेचं म्हणजे दिवसा शेर आणि रात्री ढेर किंवा दिवसा शेर आणि रात्री मांजर अशी अवस्था असल्याचा निशाणा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री बनवण्याचं वचन तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं का? असा सवाल विचारावा लागतो. कारण आता ‘मातोश्री’वरुन नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात, असा टोला फडणवीसांनी लगावला. पालघर जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारार्थ पालघरमध्ये आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस (Devendra Fadnavis Palghar Speech) बोलत होते.
‘पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात सातत्याने येण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पालघर जिल्हा 2014 मध्ये अस्तित्वात आला, पण पालघरच्या मतदारसंघांमध्ये 1960 नंतर सर्वात जास्त वेळा कोणी मुख्यमंत्री आला असेल, तर तो मी होतो, असा दावा फडणवीसांनी केला. पाच वर्षे सातत्याने येऊन पालघरच्या समस्या घेतल्या. विविध घटकांपर्यंत आपल्याला कसे पोहचता येईल, सरकारच्या योजना कशा पोचवता येईल याचा प्रयत्न केला. आपल्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रचंड यश मिळालं होतं, पण विरोधी पक्षनेता म्हणून निवडून आलो, असं देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.
ज्या मित्राला सोबत घेऊन, त्याचाही प्रचार करुन, आपल्यासोबत निवडून आणलं, त्याने जनादेश मिळूनही दुसऱ्यासोबत घरोबा केला. म्हणून आपल्याला विरोधीपक्ष म्हणून बसावं लागलं. भारतीय जनता पक्षाने एवढ्या जागा लढवल्या. त्यापैकी 70 टक्के जागांवर आपल्याला विजय झाला. भारतीय जनता पार्टी असा विद्यार्थी आहे, ज्याला 70 टक्के मार्क आहेत, तो मेरीटमध्ये आला, वर्गात पहिला आला, पण त्याला बाहेर बसवलं आणि वर्गामध्ये 40 टक्के मिळवणारे तीन विद्यार्थी एकत्र आले, असा टोला फडणवीसांनी लगावला.
हेही वाचा : आदित्य ठाकरे आणि धनंजय मुंडेंच्या खात्याविषयी ‘सामना’तून संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे अशी मागणी केली होती. काळजीवाहू सरकारने 8 हजार प्रमाणे मदत केली, परंतु त्यांच्या सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आलेली नाही. मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनाही त्यांना मदत करता आली नाही. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली, परंतु सातबारा कोरा करु, मदत करु, असं सांगणाऱ्या सरकारने अटी-शर्थी लावल्याने कोट्यवधी शेतकरी या योजनेतून लाभ घेऊ शकत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात रान उठवलं, त्या बाळासाहेबांना काय वाटत असेल, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला. बेईमानी ही जनादेशाशी झालेली नाही, शेतकऱ्यांशीही बेईमानी केली आहे, असा घणाघातही फडणवीसांनी (Devendra Fadnavis Palghar Speech) केला.