नाथाभाऊंना राजकारण नीट समजते, ते योग्य निर्णय घेतील : फडणवीस

| Updated on: Oct 13, 2020 | 5:49 PM

"नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, याचा आम्हाला विश्वास आहे" असं सूचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर दिले

नाथाभाऊंना राजकारण नीट समजते, ते योग्य निर्णय घेतील : फडणवीस
Follow us on

जळगाव : आपल्यावर झालेल्या अन्यायाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे उघड आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे” असं सूचक उत्तर फडणवीस यांनी जामनेर दौऱ्यात दिले. (Devendra Fadnavis reacts on BJP Leader Eknath Khadse possibly quitting party)

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरावर आपले मत व्यक्त केले. तसेच, मदिरालय सुरु करणाऱ्या राज्य सरकारला मंदिरे खुली करण्याचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवरही टीका केली.

“खडसेंशी चर्चा करु”

“नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण देखील नीट समजते. मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन. मला वाटते ते योग्य निर्णय घेतील” असे फडणवीस म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर खेदजनक”

“”राज्य सरकारने मदिरालये सुरु केली. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळही वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का? अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. देशातील सर्व राज्यांनी मंदिरे उघडली. कुठल्याही राज्यात मंदिरे खुली केल्याने कोरोना पसरल्याचे उदाहरण नाही. राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरे उघडण्यासाठीचे निवेदन पाठवले होते. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर खेदजनक आहे. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का?” असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

(Devendra Fadnavis reacts on BJP Leader Eknath Khadse possibly quitting party)