पंढरपूर: गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पंढरपुरात प्रसारमाध्यमांकडून तुम्ही पुन्हा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत शपथ घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी काळजी करु नका, आता फक्त भाजपचेच सरकार येईल, असे उत्तर दिले. (Devendra Fadnavis take a dig at Sanjay Raut over Love Jihad)
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पंढरपुरात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारने वीज बिल माफीच्या आश्वासनावरून घुमजाव केले. एकाही समाजातील घटकाला लॉकडाऊनच्या काळात सरकारने फुटकी कवडीही दिली नाही. लोकांना कर्मयोगी आवडतात, बोलघेवडे लोक आवडत नाही, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
तर ‘लव्ह जिहाद’वरून आधी बिहारमध्ये कायदा करुन दाखवा, असे सांगत भाजपला लक्ष्य करणाऱ्या संजय राऊत यांनाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. प्रगत महाराष्ट्राला बिहारचे अनुकरण करावे लागते, हेच आश्चर्य आहे. आता हे सरकार बिहारसारखं काय काय करतं, ते पाहू, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
संजय राऊत यांच्यापेक्षा वाईट शब्द आणि भाषा आम्हीही वापरू शकतो. आम्ही सुसंस्कृत आहोत, वाईट बोलण्याची आमची प्रवृत्ती नाही. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणाऱ्या मुलांना मारणारी शिवसेना आणि हातभर अग्रलेख लिहणारे राऊत साहेब ‘लव्ह जिहाद’ला कसा विरोध करतात, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
कोरोनाच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. एकही दिवस भाजपचे कार्यकर्ते घरी बसले नाहीत. भाजपची यंत्रणा सक्षम आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही नियोजनाची आहे. त्यामुळे आता उरलेल्या सहा दिवसांत जीवाचे रान करून काम करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
संबंधित बातम्या:
तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला
पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस-अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण!, ते सरकार अल्पजीवी का ठरलं?
(Devendra Fadnavis take a dig at Sanjay Raut over Love Jihad)