नंदूरबार : ‘शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला. आपण पराभूत केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना गेली आणि सरकार स्थापन केलं. हे सरकार जनादेशाचं सरकार नाही. आता आलेलं सरकार हे विश्वासघाताचं सरकार आहे. जनादेशाचा विश्वासघात करुन सरकार स्थापन करणारं हे देशाच्या इतिहासामधील पहिलं सरकार आहे’, असा घणाघात भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis slams shiv sena) यांनी केला. नंदूरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदूरबारमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis slams shiv sena) बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
‘एका पक्षासोबत लढायचं, त्या पक्षाच्या मदतीनं निवडून यायचं आणि निवडून आल्याबरोबर आपल्या विरोधकांसोबत घर बसवायचं, त्यांच्या भरोस्यावर मुख्यमंत्रिपद मिळवायचं, अशी बेईमानी या देशात यापूर्वी कुणीही केलेली नव्हती. आपल्याला जनतेने विरोधीपक्षामध्ये बसवलेले नाही. जनतेने तर आपल्याला निवडून दिलं, पण विश्वासघात आणि बेईमानीमुळे विरोधीपक्षामध्ये आपल्याला बसावं लागतंय. पण मी तुम्हाला शब्द देतो, भारताचा राजकीय इतिहास बघा, जेव्हा भारतामध्ये कोणत्याही पक्षाने बेईमानीनं सरकार उभं केलं ते सरकार सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ चाललं नाही. हे सरकार चालणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार आलेलं आपल्याला बघायला मिळेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर जिल्हा परिषदेची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळत आहे. मागील पाच वर्षांमध्ये देशामध्ये मोदीजींच्या सरकारनं आणि राज्यामध्ये जनतेच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो आणि आपल्या सरकारनं जे काम या ठिकाणी केलं ते काम आपण सगळ्यांनी बघितलं आहे’, असं फडणवीस म्हणाले.
‘गेल्या पाच वर्षात देशामध्ये मोदीजींनी गरिबांचाच विचार केला. दीनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण पाहिलं. प्रत्येक गरिबाला घर देण्याचं काम मोदीजींनी केलं. जिल्ह्यातील १२ लाख कुटुंबांना घर देण्याचा निर्णय झाला. त्यातील २५ हजार घरं बांधून पूर्ण झाली, उरलेली घर बांधण्याचं काम सुरु झालेलं आहे. नंदूरबार असो किंवा इतर महाराष्ट्र असो, एकही माणूस बेघर राहणार नाही, अशी काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घेत आहेत’, असा दावा फडणवीस यांनी केला.
‘नंदूरबारमध्ये जवळपास ४२५ पेक्षा जास्त वाडी, वस्त्यांमध्ये अजूनही वीज पोहचली नव्हती. या सर्व वाडी, वस्त्यांना वीज पुरवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालं. आज प्रत्येक गावात आणि वस्तीमध्ये वीज पोहचलेली आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी लोकांना अंधारात राहावं लागत नाही. या भागात सबस्टेशन झालं पाहिजे असं अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हिनाताई निवडून आल्यानंतर ती मागणी सरकारनं मान्य केली. या सबस्टेशनसाठी पैसे दिले आणि आता त्याचं काम सुरु आहे. एकदा ते सबस्टेशन झाल्यानंतर जिल्हात वीजेची कुठेही कमतरता भासणार नाही. गाव, वाडी, वस्ती या कोणत्याही भागात लोड शेडिंग राहणार नाही’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.