मुंबई : माझ्यासमोर कधीही अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय झाला नव्हता. भाजपाध्यक्ष अमित शाहांना मी विचारलं असता, त्यांनीही असं कधीच ठरलं नसल्याचं सांगितलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर अक्षरशः हल्लाबोल (Devendra Fadnavis Slams Shivsena) चढवला.
माझ्यासमोर एकदाही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणी झाली नसल्याचं मी दिवाळीदरम्यान अनौपचारिक गप्पांमध्ये बोललो होतो. अमित शाहांना विचारणा केली, तेव्हा त्यांनीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. कोणाला खोटं पाडण्याचा प्रश्नच येत नव्हता. परंतु हा विषय चर्चेने मिटवता आला असता, चर्चा थांबवण्याची गरज नव्हती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला खोटं पाडण्यासाठी हा दावा केला जात असल्याचं वक्तव्य केलं होतं.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं सांगितलं होतं, तो आमच्यासाठी धक्का होता, कारण जनतेने महायुतीला मतदान केलं होतं, असं फडणवीस म्हणाले. अजूनही युती तुटलेली आहे, असं मी म्हणणार नाही. मात्र आमची खंत दूर झाली, तर चर्चेसाठी शिवसेनेला दारं खुली आहेत, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
5 वर्ष 8 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
चर्चा आम्ही थांबवलेली नाही, चर्चेची दारं आमच्याकडून खुली होती. परंतु शिवसेनेकडून चर्चा बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता, परंतु आमच्याशी चर्चा करायची नव्हती, याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. आम्हीसुद्धा उत्तर देऊ शकतो, पण आम्हाला तसं करायचं नाही. कारण आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. वर्तमानपत्राचं आम्ही सुरुवातीला समजून घेतलं, परंतु नंतरही अशी वक्तव्य होत राहिली. विरोधीपक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्यं आम्ही समजू शकतो, पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही सत्तेत राहायचं आणि नरेंद्र मोदींसारख्या शीर्षस्थ नेत्यांवर खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही, असं फडणवीसांनी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे ठणकावून (Devendra Fadnavis Slams Shivsena) सांगितलं.
भाजप सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Devendra Fadnavis Resign as CM) दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.