नागपूर : आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधानांना पुढच्या उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं.
आता रोड कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. लवकरच हायस्पीड रेल्वे पण होणार आहे. त्याच बरोबर पुढच्या एका महिन्यात नागपूर एअरपोर्टच्या भूमीपुजनासाठीही आम्ही तुम्हाला बोलावणार आहोत, असं म्हणत फडणवीसांनी पुढच्या कार्यक्रमाचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं.
20 वर्षांपूर्वी नागपूर ते मुंबई महामार्ग व्हावा, असं स्वप्न पाहिलं होतं. पण आता ते पूर्ण झालं. मोदीजी हे केवळ आपल्या सहकार्यामुळे हे स्वप्न पूर्ण झालं. महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने मी आपले आभार मानतो, असं फडणवीस म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही फडणवीस बोललेत. जेव्हा समृद्धी महामार्गाचा विचार झाला तेव्हा फक्त एका व्यक्तीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे… त्यांना विश्वास होता की मी महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलतोय आणि ते कार्य लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होईल, असं फडणवीसांनी सांगितलं.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे लोकार्पण पार पडलं. नागपूर ते मुंबई असा 701 कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.