मुंबई : काही जण दुसऱ्यांच्या घरात मुलगा झाला म्हणून पेढे वाटत आहेत. त्यांनी ते बंद करावं, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. काहीच दिवसांपूर्वी ‘फ्री काश्मीर’च्या घोषणांवरुन जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ट्विटरवॉर रंगला होता. त्यानंतर फडणवीसांनी पुन्हा टीकेचे बाण (Devendra Fadnavis taunts Jayant Patil) सोडले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची चिंतन बैठक पार पडली. धुळे वगळता सहापैकी पाच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. नागपूरचा गड भाजपला राखता आला नाही, तर नंदुरबारमध्येही त्रिशंकू परिस्थिती आहे. वाशिम, पालघर, अकोल्यातही भाजपचा धुव्वा उडाला.
आमच्या 52 ते 106 जागा आल्या. तीन पक्ष एकत्र आल्यानंतरही भाजप मोठा पक्ष ठरला आहे. आमचा मोठा पराभव झाला अशी काही परिस्थिती नसल्याचं फडणवीस म्हणाले.
अचानक निवडणुका आल्याने आम्हाला तयारीसाठी वेळ कमी पडला. अन्यथा निकाल अजून काही वेगळा लागला असता. आजच्या निकालाने जनता आमच्या पाठीशी आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
जिल्हा परिषदेत आम्हाला 100 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. या तीन पक्षांपैकी एका पक्षाला 43, दुसऱ्या पक्षाला 45 आणि तिसऱ्या पक्षाला 71 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इतरांच्या घरी मुलगा झाला म्हणून काही लोक पेढे वाटत आहेत. त्यांनी ते बंद करावं, असा टोला फडणवीसांनी जयंत पाटलांना लगावला. विदर्भातून भाजपच्या पराभवाला सुरुवात झाल्याची टीका याआधी जयंत पाटलांनी केली होती.
मनसे आणि भाजप एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही, मनसेने कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार होऊ शकतो, त्यांची विचारसरणी वेगळी आहे, असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दोनच दिवसांपूर्वी तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवॉर रंगला होता. (Devendra Fadnavis taunts Jayant Patil)