मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली ते भाजपच्या (BJP) अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी आहे घेत आहेत. या भेटीगाठी फक्त सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस सांगत आहेत. आज ते पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेणार आहेत. कालच त्यांनी अमित शाह यांची आणि आज जे.पी नड्डा यांची भेट घेतली आहे. मात्र या हायव्होल्टेज भेटीगाठीमध्ये राजकीय चर्चा होणार नाही, असं होत नसतं. राज्यातलं खाते वाटप आणि इतर विविध विषयावर या भेटीगाठी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आज दिल्लीत फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडाच सांगून टाकला आहे.
शिवसेनेचा एक खासदार आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचं नाव श्रीकांत शिंदे आहे, अशी टिपणी यावेळी फडणवीस यांनी केली आहे. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. बंड झाल्यापासूनच ते उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही बैठकांना उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांनी जाहीर शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद ही दाखवून दिली. तसेच शिवसेनेच्या दुसऱ्या खासदार भावना गवळी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर भावना गवळी याही उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही बैठकीला दिसून आल्या नव्हत्या. त्यामुळे सहाजिकच राज्यात मोठे सत्तांतर झाल्यानंतर अनेक खासदार हे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावरूनच फडणवीसांना हा सवाल करण्यात आला होता.
याच प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेचा कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. मी आता मुख्यमंत्री झालो आहे, त्यामुळे त्यांची काम घेऊन माझ्याकडे ते येतात. किंवा माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येतात व इतर कुठल्या बैठकाबाबतही मला कोणती माहिती नाही. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून इतरही जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सध्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अनेक महानगरपालिकातील नगरसेवकांनी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट याआधीच धरली आहे. तर शिंदे गटाची भूमिका बरोबर आहे. त्यामुळे शिंदे गटासोबत गेलं. पाहिजे असं मत शिवसेना खासदारांचं असल्याच्या चर्चाही बाहेर आल्या होत्या. तसेच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत खासदारांच्या बैठका झाल्याच्याही चर्चा सुरू होत्या. मात्र आता दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर किती खरं आणि किती खोटं हे येणारे काही दिवस सांगतील.