‘मुख्यमंत्री’ हटवलं, देवेंद्र फडणवीसांची ट्विटरवर नवी ओळख!

| Updated on: Nov 13, 2019 | 8:27 AM

5 वर्ष 8 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस पदावरुन पायउतार झाले होते.

मुख्यमंत्री हटवलं, देवेंद्र फडणवीसांची ट्विटरवर नवी ओळख!
Follow us on

मुंबई : ‘मी पुन्हा येईन’ असं त्रिवार सांगणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर आपली नवी ओळख लिहिली आहे. ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ काढून ‘महाराष्ट्र सेवक’ असं फडणवीसांनी आपल्या ‘बायो’मध्ये (Devendra Fadnavis Twitter Account) लिहिलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात गेली आहेत. 13 व्या विधानसभेचा कालावधी संपताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता.

5 वर्ष 8 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस पदावरुन पायउतार झाले होते. त्यावेळी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपला निमंत्रण देण्यापूर्वी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीसांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची विनंती केली होती.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही संपुष्टात आली आहे. लगेचच फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन नावापुढे लावलेलं ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ असं लिहिलं (Devendra Fadnavis Twitter Account) आहे.

देवेंद्र फडणवीस यांची ओळख कुशल युवा राजकारणी म्हणून केली जाते. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्रिपद असा यशस्वी टप्पा देवेंद्र फडणवीस यांनी पार केला आहे.

सत्तासंघर्ष कसा चालला?

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने शिवसेनेची इच्छा नसल्याचं रविवारी (10 नोव्हेंबर 2019) सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं.

शिवसेनेने सोमवारी रात्री (11 नोव्हेंबर 2019) राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली नाहीत. आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला.

राज्यपालांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री (12 नोव्हेंबर 2019) 8.30 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. परंतु राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

राष्ट्रपती राजवटीत कसा चालणार राज्य कारभार?

  • राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल राज्याचा कारभार पाहणार
  • राज्य कारभार चालवण्यासाठी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्याशी चर्चेनंतर तीन सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल.
  • हे सनदी अधिकारी राज्यपालांना सल्लागार म्हणून काम करतात.

Devendra Fadnavis Twitter Account