मुंबई : राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेला मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा, नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बोलावलेल्या बैठकीकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवली होती. त्याबाबत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच राणा दाम्पत्याविरोधातील सरकारच्या कारवाईवरुनही फडणवीसांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरु असतानात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एन्ट्री झाली. त्यावेळी फडणवीसांनी काही वेळ पत्रकार परिषद थांबवून त्यांना बसण्याची विनंती केली आणि मग पुढे आपला मुद्दा पूर्ण केला.
जो पर्यंत भोंग्यांचा प्रश्न आहे, त्यासंदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका आमची आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत त्या निर्णयांचं तंतोतंत पालन करायचं. पूर्वी नवरात्रात आम्ही रात्र-रात्र भजन करायचो, गरबा करायचो. कुठलाही हिंदूंचा सण मग तो गणपती असो, रात्री 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत सण साजरे करायचो. ज्याक्षणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 10 वाजेनंतर माईक चालणार नाहीत. तेव्हा आम्ही तो निर्णय मान्य केला. ज्या 15 दिवसांत त्यात सूट मिळते त्याच 15 दिवसांत 12 वाजेपर्यंत आम्ही चालवतो. 100 वर्षाची परंपरा असलेल्या पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणुकीत देशी वाद्यांव्यतिरिक्त काही वाजवत नाहीत. मग अशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हिंदू समाज मान्य करत असेल, तर तो आदेश इतर सर्व समाजानेही मान्य केलाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे, असं फडणवीस म्हणाले. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दाखल झाले. त्यावेळी तेव्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषद थांबवून राणेंना निमंत्रण दिलं. या… राणे साहेब या इथे, असं फडणवीस म्हणाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली खूर्ची रिकामी करुन दिली. त्या खुर्चीवर राणे येऊन बसले. त्यानंतर फडणवीसांनी आपला मुद्दा मांडण्यास पुन्हा सुरुवात केली.
गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? जे काही मुंबईत सुरु आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरु आहे. त्यामुळे ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत, त्या बैठकीला गृहमंत्री आम्हाला बोलावून काय करणार आहेत? आणि कोणता निर्णय घेणार आहेत? इतक्या मोठ्या बैठकीला मुख्यमंत्रीच राहत नाहीत, तर ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास आहे का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
इतर बातम्या :