नागपूर: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी बावनकुळे यांना पुढच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाही, असंही गडकरी यांनी सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने बावनकुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. गडकरी यांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत. फडणवीस जर पुढचे मुख्यमंत्री होणार असतील तर शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो. बावनकुळेजी, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्हाला शुभेच्छा देत नाही बरं. अडचण अशी आहे की जे बोललो नाही ते माझ्या नावाने मीडियात खपवतात. अरे हिंमत असेल तर तुमच्या नावाने छापा ना. माझा का उपयोग करता? उद्या गडकरींचा फडणवीसांना संदेश असं काही छापून यायचं. मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजे. फडणवीस जर केंद्रात गेले तर नंतर बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो, असं नितीन गडकरी म्हणाले.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मुलगा आणि आईचा पक्ष नाही. फडणवीसांच्या वडिलांच्या हाताखाली मी काम केलं. फडणवीसांचे वडील आजारी होते. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला राजकारणात घ्या कधीच म्हटलं नाही. फडणवीसांनी जे काही मिळवलं ते स्वत:च्या कष्टाने मिळवलं. ते स्वत:च्या मेहनतीने खूप पुढे गेले आहेत, असं सांगतानाच म्हणून मी म्हणतो कुणी माझ्या मुलाला तिकीट द्या, असं म्हणत असेल तर बिलकुल देऊ नका. नाहीतर मी विरोध करेल. ज्याला जनता म्हणेल त्याला तिकीट दिलं जाईल, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.
यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनाही चिमटे काढले. बावनकुळे खूप मेहनत करून आले. त्यांनी बायको पळवून आणली. ते तेली. बायको कुणबी आहे, असं गडकरींनी म्हणताच एकच खसखस पिकली.
काही कार्यकर्ते मेहनत करून पुढे येतात. काही मागच्या दारातून येतात. मात्र बावनकुळे यांनी खूप मेहनत केली. त्यांनी खूप परिश्रम केले. ऊर्जा खात्यात त्यांनी मोठं काम केलं. विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नव्हतं. त्यांनी ते मिळवून दिलं. बावनकुळेंमध्ये एवढे कर्तृत्व आहे की, ते केव्हा माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील हे सांगता येत नाही. म्हणजे कुठलं काम कास करायचं आणि निधी मिळवायचा हे त्यांना कळतं, असं त्यांनी सांगितलं.