पुणे : काहीही झालं तरी मी बेळगावला जाणारच, असं धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी ठामपणे सांगितलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावमध्ये महामेळावा (Maharashtar Ekikaran Samiti Mahamelava) होणार होता. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने यांनी आपण बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. त्यानंतर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
चंद्रकांत पाटील ,शंभूराजे देसाई आणि मी लवकरच बेळगावात जाणार आहोत. कितीही विरोध केला, काहीही झालं तरी आम्ही बेळगावला जाणारच आहोत, असं धैर्यशील माने म्हणाले.
आम्ही बेळगावात जाण्याचा निर्णय घेतलाय. अधिवेशन सुरू आहे पण आम्ही तिघे एकत्र कर्नाटकात दिसू, असं त्यांनी सांगितलं आहे.
मराठी माणसावर अन्याय होत असेल तर त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. मराठी माणसांना त्रास झाला तर कानडी माणसालाही त्रास होऊ शकतो हे कर्नाटक जाणून आहे. प्रत्येकानं आपल्या पक्षाची भूमिका मांडणं क्रमप्राप्त आहे. मराठी माणसांच्या पाठिशी महाराष्ट्र आहे त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कर्नाटकातील प्रशासनाने दडपशाही थांबवली नाही तर त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल, असं म्हणत धैर्यशील माने यांनी कर्नाटक सरकारवर शाब्दिक हल्ला केलाय.
मी काल कर्नाटकला पत्र लिहून कळवलं होतं की, मी तिकडे येतोय म्हणून. मला जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आलं आणि त्यात त्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटक किंवा बेळगाव भागात नाहीये. त्यामुळे त्यांनी या कारणाने मला परवानगी का नाकारली याचं उत्तर मिळायला हवं, असं धैर्यशील म्हणालेत.