कोल्हापूर : लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडी विशेषत: फोडाफोडीला ऊत आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती लोकसभा निकालानंतर येत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय महाडिक हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे असलेले धनंजय महाडिक यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरमधून पराभूत झालेले माजी खासदार धनंजय महाडिक हे काल मुख्यमंत्र्यांना भेटले. वर्षा बंगल्यावर रात्री ही भेट झाली. कारखान्याच्या कामासाठी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तरी सध्या काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
संसदरत्न अशी ख्याती मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांच्यावर जवळपास 2 लाख मतांनी विजय मिळवला. धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला. विशेषत: काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचं वैर राज्यभर गाजलं. आमचं ठरलंय ही सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका राज्यभर प्रचार पॅटर्न म्हणून गाजली.
धनंजय महाडिक यांच्या एका घरात 3 पक्ष
धनंजय महाडिक यांच्या एकाच कुटुंबात तीन-तीन पक्ष असल्याचं यापूर्वीच राज्याने पाहिलं आहे. त्यांचे काका महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते. मात्र त्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात काम केल्याने त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. काका काँग्रेसचे, तर धनंजय महाडिक स्वत: राष्ट्रवादी खासदार होते. त्यांचा चुलत भाऊ अमल महाडिक हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महाडिक कुटुंबात एकाच घरात तीन तीन पक्ष एकेकाळी पाहायला मिळाले.
तर धनंजय महाडिक तिसऱ्या पक्षात
धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादीत असले तरी तो त्यांचा मूळ पक्ष नाही. धनंजय महाडिक यांनी यापूर्वी शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
काही वर्षानंतर सदाशिवराव मंडलिक आणि शरद पवार यांच्यात बिनसले. त्यामुळे मंडलिकांनी राष्ट्रवादी सोडली. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत, कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला. मात्र 2009 मध्ये त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीराजेंना तिकीट दिलं. त्यावेळी संभाजीराजेंचाही पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादीने 2014 मध्ये धनंजय महाडिक यांना तिकीट दिलं आणि ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.
धनंजय महाडिक यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर आता त्यांचा तो तिसरा पक्ष ठरेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास धनंजय महाडिक हे करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | संजय मंडलिक (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) | पराभूत |
अपक्ष/इतर | डॉ. अरुणा माळी (VBA) | पराभूत |
संबंधित बातम्या