लातूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील जुगलबंदी सर्वांना माहिती आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती. मात्र, लातूरमधील (Latur) एका विवाहसोहळ्याच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याचं पाहायला मिळालं. राजकीय कट्टर विरोधक म्हणून मुंडे भावंडांची राज्यात ओळख आहे. मात्र. हेच भावंडं एका विवाह समारंभात एकत्र आले आणि मनमुरादपणे गप्पा मारल्या. अत्यंत जवळच्या नात्यातला विवाह असल्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. धनंजय मुंडे हे सकाळपासूनच लग्नात उपस्थित होते. तर, पंकजा मुंडे या दुपारनंतर विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाची तेजश्री वामनराव केंद्रे यांच्या विवाहानिमित्त उपस्थित राहिले होते. दोघांनीही नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिला. एवढंच नाही तर विवाहस्थळी दोघाही बहीण भावांनी एकमेकांच्या हाताला जोरदार टाळी दिली.
पंकजा मुंडे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्या लहान मुलीला जवळ घेत प्रेमाने विचारपूस केली. एरवी राजकारणात कट्टर शत्रू असलेले मुंडे भावंडं आज हसतमुख होऊन एकत्रित आल्याचे हे सर्व क्षण बऱ्याच दिवसांनंतर दिसून आलं. मुंडे भावा बहिणींमधील हे क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे पार पडला. या विवाह सोहळ्यात कोविड विषयक नियमांचं पालन करण्यात आलं. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व मुंडे परिवार एकत्रित दिसून आले.
इतर बातम्या: