परळी : परळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी शेकडो एकर जमीन घेऊन ठेवली, त्यामुळे आज बाजार समिती समृद्ध आणि श्रीमंत आहे. नवी मुंबईच्या मार्केट कमिटीप्रमाणे या मार्केट कमिटीचादेखील राज्यभरात नावलौकिक होईल, असे गौरवोद्गार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काढलेत.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिरसाळा येथील जागेतील उपबजार पेठेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या 93 गाळ्यांच्या भव्य व्यापारी संकुलाच्या कामाचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. अनेक वर्ष या संस्थेचा कारभार स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी चालवला. त्या काळापासून त्यांनी दूरदृष्टीने या संस्थेला समृद्ध केले. कायम शेतकऱ्यांचे आणि खातेदारांचे हित जोपासले. आपल्या ताब्यात असलेली एखादी संस्था कशी चालवावी, याची आदर्श आचारसंहिता आम्हाला स्व. अण्णांनी शिकवली, असेही धनंजय मुंडे म्हणाले. एमआयडीसीपाठोपाठ निवडणुकीत दिलेला हा दुसरा शब्द मार्गी लागत असल्याचा आनंद व समाधान वाटत असून, येत्या काळात बाजार समितीची इमारत देखील नव्याने उभारण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले.
आम्ही अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला चिखल तुडवत गेलो, मात्र वर्षातून दिवाळी-दसऱ्याला येणाऱ्या विरोधकांनी त्यावरून टीका केली, त्यांना हे माहीत असावं की आम्ही नुसते फिरलो नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती सरकार दरबारी मांडून आर्थिक पॅकेजच्या स्वरूपात मदतही खेचून आणली. भाजपने जिल्ह्यात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आंदोलन केले. तसेच आंदोलन लखीमपूर खिरी इतक्या घटनेबाबत भाजपकडून करणे अपेक्षित होते, मात्र भाजप इथल्या आणि तिथल्या शेतकऱ्यांबाबत वेगवेगळ्या भूमिकेत का आहे, असा सवालही मुंडेंनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले, तेव्हापासून जनतेतून गायब असलेले विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात, एक दिवस लोकांमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला येतो आणि परत निघून जातात. मात्र आम्ही पहिल्या दिवसापासून मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेकडो रुग्णांना कोविड काळात मदत केली, हजारो कुटुंबांना अन्न धान्य पुरवले, हजारोंना मोफत रेमडिसिव्हीर उपलब्ध करून दिले, त्यात काही भाजपचे कार्यकर्ते पण होते. पण आम्ही केलेली मदत या हाताची त्या हाताला कळू देत नाही, असा आमचा स्वभाव आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विरोधकांचा नाव न घेता समाचार घेतला. या आणि अशा आणखी काही विषयांवर मी बोलणार आहे, सगळं आजच संपवत नाही, असा सूचक इशाराही धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिला.
दरम्यान एकीकडे मतदारसंघातल्या संस्था समृद्ध होत आहेत तर दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांची आशास्थान असलेला वैद्यनाथ साखर कारखाना वाईट अवस्थेत आहे. तो यंदा सुरू होणार आहे का असे किमान एखादे ट्विट करून तरी सांगावे, असे म्हणतच या भागातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊ, असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला.
या कार्यक्रमास आ. संजय भाऊ दौंड, शिवाजी सिरसाट, जि. प. गटनेते अजय मुंडे, रा.कॉ. तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, जि. प.सदस्य प्रा. मधुकर आघाव, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अंबाजोगाई मार्केट कमिटीचे सभापती गोविंदराव देशमुख, पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, रा.कॉ. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, परळी मार्केट कमिटीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, सूर्यभान नाना मुंडे, भाऊसाहेब नायबळ, माऊली तात्या गडदे, माणिकभाऊ फड, जानिमिया कुरेशी, बालू किरवले, सिरसाला सरपंच राम किरवले, इम्रान खान, राजा खान, राजाभाऊ पौळ, सूर्यकांत मुंडे, संजय जाधव, शिवाजी शिंदे, रामकीसन घाडगे, श्री रामदासी, विष्णुपंत देशमुख, प्रभाकर पौळ, माऊली मुंडे, विलास बापू मोरे, विश्वाभर फड, माधव मुंडे, रामदादा कांदे, गोविंदराव मुंडे, राजेंद्र सोनी, चंद्रकांत कराड, सौ. कल्पनाताई आघाव, अश्रूबा काळे, सुभाष नाटकर, गोविंद कराड, लेखन गायकवाड, सचिन होळंबे यांसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या
क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार
लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमला खिंडार, 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!