मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. धनंजय मुंडे ठणठणीत असल्याने त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. (Dhananjay Munde likely to get discharge after COVID Treatment)
धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 12 जून रोजी समोर आले होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दुसरा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाण्याची चिन्हं आहेत. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागेल.
मुंबईत धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस अशा पाच जणांचा समावेश होता. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर उपचार करण्यात आले.
दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.
हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन
धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपल्या समर्थकांना उपास-तापास, नवस न करण्याचे आवाहन केले होते.
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 https://t.co/wcFV0uoqbW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020