बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज वाढदिवस. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पवारांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत तर जयंतीदिनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. (Dhananjay Munde on Sharad pawar And Gopinath Munde)
शरद पवार हे विश्वविद्यापीठ आहे. ते माझ्यासाठी देवमाणुस आहेत, अशा भावना धनंजय मुंडे यांनी वाढदिवसादिनी व्यक्त केल्या. तर आप्पा आजही आमच्यात आहेत असंच आम्हाला वाटतं. आप्पांच्या संघर्षाचा वसा जपतोय, अशा आठवणी धनंजय मुंडे यांनी जागवल्या.
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमात व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांनी सहभाग नोंदवून पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी देव कोणी बघितला की नाही मला माहीत नाही पण शरद पवार हे माझ्यासाठी देवमाणूस असल्याचं ते म्हणाले.
“मराठवाड्यात एक म्हण आहे , होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होत करायचं… ही म्हण शरद पवार यांनी वर्षभरापूर्वी खरी करून दाखविली असं सांगत धनंजय मुंडे यांनी सत्तास्थानेच्या घडामोडींना उजाळा दिला. 56 आमदारांचा राज्याचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री व 44 आमदारांच्या पक्षाचे मंत्री होतात आणि 105 आमदार असलेला भाजपा विरोधात बसतो याला खरं लोकशाहीचे दर्शन म्हणतात आणि हे पवारांनी करुन दाखविले याचा अभिमान आहे, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला चिमटा काढला.
धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. गोपीनाथ मुंडे यांच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी आहेत. मी त्यांच्यासोबत सावलीसारखा राहिलो. त्यांच्या अनेक आठवणी असून त्यांनी संघर्षाचा वसा दिला. त्याप्रमाणे मी जनतेची कामे प्रामाणिकपणे करतोय, असे धनंजय मुंडे म्हणाले.
(Dhananjay Munde on Sharad pawar And Gopinath Munde)
संबंधित बातम्या
आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात, धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी