परळी (बीड) : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळा जमणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी (Dhananjay Munde Remembers Gopinath Munde) जागवल्या आहेत.
‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. सोबत पोस्ट केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या तस्वीरीसमोर लीन झालेले दिसत आहेत.
याआधी, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन अभिष्टचिंतन केलं. ‘साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना!’ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान सप्ताह’ साजरा केला जात आहे, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
विशेष म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंडेंच्या औरंगाबादमधील स्मारकाचं काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचंही धनंजय मुंडेंनी काल ट्विटरवरुन सांगितलं होतं.
गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळा
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. मुंडे समर्थकांना संबोधित करताना पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार, आपल्या मनातील नाराजी आणि खदखद व्यक्त करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही तासांत मिळणार आहेत. पंकजा मुंडे दुपारी एक वाजता संबोधित करतील.
पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, रासप अध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत. यापैकी खडसे, तावडे, मेहता यासारखे नेते विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेल्यामुळे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे नाराजांच्या मेळ्यात वेगळा मार्ग निघणार, की शक्तिप्रदर्शनात भाजपवर दबाव टाकला जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हा कार्यक्रम राजकीय नसून गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते तिथे येणार आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. या मेळाव्यातून पोस्टर्सवर आधी कुठेही भाजपचा उल्लेख किंवा कमळ चिन्ह नव्हतं, मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नव्हते. परंतु दुपारनंतर जुने पोस्टर्स हटवून भाजपचं चित्र असलेले नवे बॅनर झळकवण्यात आले.
Dhananjay Munde Remembers Gopinath Munde