अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केलीय. भाजपचे नेते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावते, असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला. सुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचं राजकारण केलं जातंय. हे केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कळून चुकलं आहे, असाही आरोप मुंडेंनी केला. ते आज (2 सप्टेंबर) अहमदनगरमध्ये आले असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, “सुरुवातीपासूनच अतिशय बदल्याचं राजकारण केलं जात आहे हे केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कळून चुकलं आहे. भाजपचे अनेक नेते केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन चौकशा लावत आहेत. त्यामुळे खरं काय हे सर्वांच्या समोर येणार आहे. सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचं स्पष्ट झालंय. खरं काहीच नाही, गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. हे भाजपचं ठरलेलं तंत्र आहे.”
“30-30 वर्षे अधिकारी एकाच ठिकाणी काम करत असतील तर त्यांची बदली व्हायला पाहिजे हे स्वाभाविक आहे. कायदा-नियमाला धरुन सर्व बदल्या केल्यात,” असं सांगत धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी चौकशीचा पूढचा नंबर जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी कुणाला किती गांभीर्याने घ्यायचं हे माहिती आहे असं म्हणत सोमय्या यांना टोला लगावला.
धनंजय मुंडे म्हणाले, “राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी पूर आला म्हणून नुकसान झालं. याबाबत कालच मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. प्राथमिक किती नुकसान झालं हे आम्हाला सांगितलं आहे. मात्र, वास्तविक किती नुकसान झालं याचा अहवाल यायला दोन-तीन दिवस लागतील, पण जे काही नुकसान झाले त्याबाबत भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.”
Dhananjay Munde say BJP leaders interfering in CBI ED for action on opposition