बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde Pankaja Munde) यांनी विधानसभा निवडणूक, सत्ता, विरोधीपक्ष यासह विविध विषयावर टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया दिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंबाबतही (Dhananjay Munde Pankaja Munde) भाष्य केलं. पंकजा मुंडे यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
पंकजा मुंडे यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या का?
धनंजय मुंडे म्हणाले, “शुभेच्छा त्यांच्याकडून मला यायला पाहिजे. मी त्यादिवशी तुम्हाला जे सांगितलं त्यांना तसे आजही तेच वाटतंय. हे शेवटी या निवडणुकीमध्ये भावाची आणि बहिणीची ही निवडणूक जरी आपण सगळे म्हणतात तरी ती दोन पक्षाच्या उमेदवारांची निवड होती. दोन पक्षांच्या विचारांची निवडणूक होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पक्ष हरला. त्यांचा विचार हरला. आमचा पक्ष जिंकला. आमचा विचार जिंकला. राहिला विषय बहीण-भावाच्या नात्यांचा तर मी मोठा आहे. नक्कीच विजयाचा आनंद आहे. पण कुठेतरी दुःख आहे. शल्य आहे की शेवटी घरातलाच एक व्यक्ती या निवडणुकीत आपल्याकडून पराभूत झाला. त्यामुळे जे माझं मत होतं ते स्वाभाविक आहे. घरातला मोठा म्हणून या ठिकाणी आपल्यावर ती जबाबदारी आपण पार पडतोय. म्हणून ते दुःख शल्य मनामध्ये होतं आजही आहे. राहिला विषय मी शुभेच्छा द्यायचा तर निवडणूक मी जिंकलो. शुभेच्छा मला यायला पाहिजे होत्या. पण ठीक आहे. आपण समजून घेऊ शकतो. तसं काय आमच्यामध्ये अनेक दिवसांमध्ये संवाद नाही. पुढे कुठले संवादाची अपेक्षा माझ्यासारख्यांनी ठेवू नये. तेही उचित नाही. माझ्यासारख्याने संवाद केला तर त्या संवादाचा सन्मान होईल किंवा मान ठेवला जाईल असे माझ्यासारख्याला पूर्वीचा अनुभव लक्षात घेता आज वाटत नाही. तो काय आता आमच्या विषय राहिला नाही”
काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनणार का ?
आम्ही शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, ही भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची महाआघाडी आहे. ती विरोधीपक्षात बसेल. महाराष्ट्रातील प्रश्नांवर येणाऱ्या काळात जे कुठलं सरकार असेल, त्यांच्याशी ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्नशील राहू. वेळ पडली तर सरकारशी संघर्ष ही करू. साहेबांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर याबाबतची चर्चा व्हावी असे मला वाटत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.
तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल का ? तुम्ही तसे प्रयत्न करत आहात का ?
मी कधी ही कुठल्याही पदासाठी काम केले नाही. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवारांनी माझ्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार साहेबांनी माझ्यावर विधानपरिषद विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी टाकली. मी योग्यरित्या या पदाला न्याय दिला.
महाराष्ट्राच्या जनतेच्या अनेक समस्या मी विधानपरिषदेत मांडल्या. त्यासाठी मला सरकारशी संघर्षही करावा लागला. एवढंच नाही काही प्रमाणात आपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला विरोधी पक्षात राहून सुद्धा न्याय मिळू शकतो, हेसुद्धा मी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिले. राहिला विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते याचा कोणताही दावा केलेला नाही. मी कुठल्याही पदासाठी प्रयत्न केलेला नाही. यापूर्वीच्या विरोधीपक्षनेते पदासाठी मी दावा केला नव्हता. राहिला विषय माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा तर पक्षाने एवढे सारे काही दिले. त्यामुळे त्या भूमिकेत पक्ष मला विधिमंडळाच्या खालच्या सभागृहात राहील तशी माझी भूमिका ठामपणाने विरोधी पक्ष सदस्य म्हणून मांडत राहील, असं धनंजय मुंडे म्हणाले.
परतीच्या पावसाने नुकसान, शेतकऱ्यांना भरपाई द्या
परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे तात्काळ पंचनामे व्हावेत, पंचनामे होऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना मदतीच्याबाबतीत तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे. मला हे मान्य आहे की आत्ताच निकाल लागला आहे आणि कुणी सरकार बनवण्यासाठी राज्यपालाकडे गेले नाहीत. दिवाळीच्या काही दिवसाच्या सुट्ट्या संपल्यानंतर तात्काळ प्रशासनाने याबाबत पावले उचलावीत. मुख्य सचिवांनी राज्याच्या विभागीय आयुक्तांना सांगून विभाग आयुक्तकडून कलेक्टरला सांगून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी अशी माझी मागणी आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.