धाराशिव, संतोष जाधव : एकेकाळी सोबत असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व मंत्री डॉ तानाजी सावंत (Tanaji Sawant) या दोन कुटुंबातील राजकीय वाद चांगलेच उफाळून आलेत. सावंत यांना एकदाही सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे निवडणुकीत गुलाल लागला नाही. केवळ नातेवाईक असल्याने त्यांना धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात आणले त्यांनीच घात केला, अशी वेळ आज माझ्यावर आली आहे, असे सांगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पश्चाताप व्यक्त केला. आगामी काळात जशास तसे उत्तर देऊन सोलापूर जिल्ह्यातुन आणलेले हे पार्सल परत पाठवून देऊ, त्यांनी मला डिवचले आहे. आता त्यांना सोडणार नाही, असे पाटील म्हणाले. सावंत गटाकडून याला कसे उत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जिल्हा बँकेच्या संचालकपदाची नोटीस पाठवून अपात्र केले. सावंतांच्या पैशाचा अन् सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. सावंताना थोडी लाज असेल आणि पैसा सत्तेची इतकी खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जा, मग जनता ठरवेल त्यांना कोणता नेता पाहिजे. डिपॉझिट जप्त करुन पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत त्यांना खुले आव्हान पाटील यांनी दिले आहे.
ज्यांना बोटाला धरून जिल्ह्याचे राजकारण शिकवलं, राजकारणात संधी दिली. त्यांनीच माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन रुग्णालयातील आयसीययुमध्ये असताना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचे नोटीस पाठवून त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सावंत यांनी कपटी राजकारण केले, असा आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी केलाय. सावंत यांनी कपटाने रचलेला डाव तालुक्यातील जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. सावंतांच्या खांद्यावर गुलाल टाकण्याच पहिलं काम मी केले होते त्यासाठी स्वतःच्या भावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी न देता सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना दिली, निवडून आणलं जिल्हा परिषदेत सभापती केले त्यावेळी डॉ. तानाजी सावंत आमदारही नव्हते. ही तुमची कुठली नीतिमत्ता? असा सवाल केला.सत्ता येत असते जात असते सत्तेचा माज येवू द्यायचा नसतो.
माजी आमदार पाटील हे सत्ता नाट्यानंतर मंत्री सावंत यांना भेटले होते त्यावेळी पाटील हे सावंताच्या गळाला लागले अशी चर्चा झाली. मात्र त्यानंतर पाटील हे सावंताच्या कळपात न गेल्याने त्यांना सावंताच्या रोशाला सामोरे जात धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक पद गमवावे लागले, असे म्हटले जात आहे. त्यानंतर राजकीय वादाची होळी पेटली आहे, हा वनवा आगामी काळात चांगलाच पेटणार आहे.
सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील नेते आहेत. उमरगा येथील आमदार ज्ञानराज चौगुले हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ असल्याने मंत्री सावंत यांच्यापासून पहिल्यापासून चार हात सुरक्षित अंतर ठेवून आहेत. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे तानाजी सावंत यांना आव्हान आहे. सावंत यांचे धाराशिव शहरातील प्रस्थ वाढल्याने त्यांच्या संस्थानाला भाजप आमदार राणा पाटील यांच्याकडून उघडपणे विरोध होत आहे. राणा हे सावंतांचे राजकीय मांडलीकत्व स्वीकारायला तयार नाहीत म्हणून धुसफूस आहे. एकंदरीत सावंत आगामी काळात एकटे पडणार असल्याचे चित्र आहे.
साखर कारखानदारीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून धाराशिव जिल्ह्यात आलेले सावंत हे सुरुवातीला व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते बनले. धाराशिव इथली राजकीय नेत्यांची मानसिकता व आर्थिक पोकळी ओळखुन राजकारणात उतरले आणि अर्थकारणाच्या जोरावर आता ते इथले सत्ताधीश झाले. आगामी काळात राजकीय कुरघोड्या वाढणार आहेत. सावंत यांच्या विरोधात सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र करणार असल्याचे माजी आमदार पाटील म्हणाले.