मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा शिवसेनेतील आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. पण या सगळ्या घटनाक्रमात धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी मात्र बंडात सहभागी न होण्याचं ठरवलं. सूरतच्या दिशेने सुरू असलेला प्रवास त्यांनी मध्येच थांबवला अन् पुन्हा मुंबई गाठली. त्या दिवसाचा घटनाक्रम नेमका काय होता? याबाबत कैलास पाटील यांनी खुलासा केला आहे.
अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत. बंडाच्या दिवशीच्या सुटकेचा थरार कैलास पाटील यांनी सांगितला.
त्या दिवशी विधानसभेची मतमोजणी होती. कामासाठी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर गेलो. तिथं त्यांनी सांगितलं की आपल्याला पुढे एका ठिकाणी जायचं आहे तुम्ही पुढे चला… मग मी ठाण्याला महापौर बंगल्यावर गेलो. कारण तिथं अनेक बैठका व्हायच्या. पण त्यावेळी तिथं चार-पाच आमदार होते. तिथं पहिल्यांदा मनात शंकेची पाल चुकचुकली. वाटलं काहीतरी वेगळं घडतंय.
ठाण्याच्या महापौर बंगल्यावरून उद्धवसाहेबांना लोकेशन पाठवलं. त्यांना फोन करून सांगितलं की इथं आमदार जमले आहेत. मला काहीतरी वेगळं वाटतंय.
मग एकनाथ शिंदे यांच्या माणसाने आम्हाला गाडीत बसवून बाहेर नेलं. मग हळूहळू कळू लागलं की आपण शहराच्या बाहेर पडतोय. पण मी उद्धवसाहेबांच्या संपर्कात होतो. त्यात माझ्या फोनची बॅटरी संपत आली होती.
मी संधी सोधत होतो की आपली गाडी थांबेल आणि पळ काढता येईल. पण चहासाठीही गाडी थांबत नव्हती. बाहेर पाऊस सुरू होता.
गाडी तालासरी चेक पोस्टला आली. तेव्हा चालत हा चेकपोस्ट ओलांडा असं सांगण्यात आलं. माझ्या मनात पक्क होतं की महाराष्ट्राची सीमा ओलांडायच्या आत आपण परत जायचं. मग मी चेकपोस्ट ओलंडायच्या निमित्ताने गाडीतून उतरलो. पहिला फोन उद्धवसाहेबांना केला. मग त्यांनी गाडी पाठवतो असं सांगितलं.
जवळपास एक दीड किलोमीटर चालत आलो. मग एक दुचाकीला हात केला आणि त्यावरून काही किलोमीटर प्रवास केला. पुढे एका हॉटेलला गेलो. तिथं चहा-पाणी घेतलं.
त्या हॉटेलवरच्या अनेकांना लिफ्ट मागितली पण कुणी द्यायला तयार नव्हता. मग एका ट्रकवाल्यानं मला लिफ्ट दिली. त्याच्याच फोनवरून मी उद्धवसाहेबांनी पाठवलेल्या माणसाशी बोललो. मग पुढे त्या ट्रकला वेगळ्या दिशेने जायचं होतं. तेव्हा मी तिथं उतरलो. त्यांचे आभार मानले. त्यांना सांगितलं की मी आमदार आहे. मी अडचणीत होतो. म्हणून मी तुमची मदत घेतली. तेव्हा तुमचा माणूस येईपर्यंत त्या ट्रकचा ड्रायव्हर थांबला माझी गाडी आल्यावर तो गेला. मग मी रात्री उशीरा बारा एकच्या दरम्यान मी उद्धवसाहेबांना भेटलो.
सत्तांतराच्या काळीतील घडामोडींवर या मुलाखतीत भाष्य करण्यात आलं आहे.