संतोष जाधव, धाराशिव : एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना गद्दार, डाकू असे विरोधकांकडून वापरले जात आहेत. मात्र आता जनतेतूनही याच शब्दांनी थेट सवाल विचारला जातोय. याचाच प्रत्यय उस्मानाबाद अर्थात धाराशिव (Dharashiv) येथे आला. काल धाराशिव येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे कोर्टाच्या कामानिमित्त आले होते. बच्चू कडू यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे आणि भाजप युतीला पाठिंबा दिला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता आहे. मात्र शिंदे-भाजप युतीसोबत गेल्यामुळे तुम्ही गद्दारी केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. धाराशिव येथे काल बच्चू कडू यांच्या दौऱ्यात काल प्रचंड ड्रामा झाला.
कोर्टाचं काम आटोपून बच्चू कडू बाहेर निघत होते. ते कार्यकर्त्यांशी, जनतेशी संवाद साधत होते. तेव्हा एक वृद्ध शेतकरी तेथे आले. बच्चू कडू यांना थेट सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राला जनतेला काय त्रास द्यायलेत? गद्दारी केली. हा गद्दारीचा बाप आहे..अशा शब्दात ते जाब विचारत होते. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, हे त्या शेतकऱ्याला विचारण्यात आलं. मात्र हा आमचा आमदार आहे, त्याने गद्दारी केली, असं वारंवार ते बोलत होते. अखेर बच्चू कडू गाडीत बसले. त्यानंतरही या शेतकऱ्याने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अखेर या शेतकऱ्याला बाजूला केलं आणि बच्चू कडू यांचा ताफा पुढे रवाना झाला.
बच्चू कडू कोर्टातून बाहेर जात असताना अडवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे अर्जुन भगवान घोगले. ते ८० वर्षांचे आहेत. बच्चू कडू यांचा ताफा पुढे निघून गेल्यानंतर, तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं, अशी प्रतिक्रिया माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारली. त्यावेळी ते म्हणाले, ‘ज्या आशेनं निवडून दिलं, तसा तो वागत नाही. तो एका डाकूबरोबर गेला. तो देवेंद्र आणि शिंदे यांच्याबरोबर गेला. हे जे चाललय ते योग्य नाही. क्षेत्राबाहेर आहे, घटनेची पायमल्ली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांना असा सवाल करणाऱ्या शेतकऱ्याची दखल संजय राऊत यांनीही घेतली. सदर शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी काही ओळी लिहिल्या आहेत. बच्चू कडू यांना काल कशाप्रकारे जाब विचारण्यात आला, याचा उल्लेखही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या ओळी अशा-
तुमने बेवफाई की वफ़ा का नाम लेकर।
हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर।
तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर।
हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर ।