नवी दिल्ली : माजी आमदार अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 मार्चला मतदान होणार आहे. (Dhule Nandurbar Vidhan Parishad Bypoll)
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीतर्फे कोणाला रिंगणात उतरवलं जाणार याची उत्सुकता आहे. भाजपच्या गोटात गेलेले अमरिश पटेलच पक्षाचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पटेलांना आपली जागा टिकवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोण आहेत अमरिश पटेल?
अमरिशभाई रसीकलाल पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती.
मूळ प्रकरण वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यावेळी अमरिश यांचे बंधू आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेलही उपस्थित होते.
निवडणूक कधी?
केंद्रीय निवडणूक आयोगाने अमरिश पटेल यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या जागेसाठी 12 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
Dhule Nandurbar Vidhan Parishad Bypoll