मुंबई : आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून विजयाचा दावा करण्यात येत असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत विजय हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा होईल, असा दावा वळसे पाटलांनी केला आहे. विजय आमच्याच उमेदवाराचा होईल कारण ऋतुजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा तीन पक्षांचा पाठिंबा आहे. तसंच राज्यात गेले काही दिवस सुरू असलेलं राजकारण जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे जनताही या सगळ्याला योग्य ते उत्तर देईल. ऋतुजा लटके विजयी होतील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. वळसे पाटलांसह महाविकास आघाडीचे नेते अंधेरीतील निवडणुकीत विजय आमचाच, असा दावा करत आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही ऋतुजा लटके यांच्या विजयाची हमी दिली आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा पाहता ऋतुजा लटके ही निवडणूक एकतर्फी जिंकतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे झालं ते शोभणीय नाही. त्यांना निवडणुकीपासून रोखणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे. न्यायलयाने फटकारल्यानंतर राजिनामा मंजूर करायला सांगणं हे सरकारी यंत्रणेला अशोभनीय आहे, असंही तटकरे म्हणालेत.