नागपूरः आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) शेवटही वादळी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यावरून महाविकास आघाडीतच (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याचं चित्र समोर आलंय. काँग्रेसच्या पुढाकारातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात अविश्वास ठरावाबाबत विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र यात तांत्रिक अडचण असल्याचे सांगत अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विविध मुद्द्यांवर सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार केला जातोय. याच कारणास्तव विरोधकांची नाराजी वाढली आणि त्यांनी अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
अविश्वास ठराव मांडण्यासाठी मविआ नेत्यांनी विधानसभा सचिवांना गुरुवारी पत्र दिलं होतं. यावर आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांचीही सही असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अजित पवार यांनी सही केलेली नाही.
काल रात्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाबाबत काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
मी सभागृहात गेलो होतो, मी आज सकाळी 9 वाजता गेलो आता 12 वाजले बाहेर आलो आहे. माझ्या मते, अध्यक्षाविरोधात एक वर्षाकरिता अवविश्वास ठराव आणता येत नाही,
त्यामुळे मी माहिती घेतो… महावविकास आघडीचे बाळासाहेब थोरात नव्हते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण नव्हते, आदित्य ठाकरे पण दिसले नाहीत… आम्ही इथे होतो, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर करवाई झाली असल्यानं ते नव्हते…
जर माझी संमती असती तर माझी सही असती? याबद्दल मला कुठली माहिती नाही उद्या सकाळी मी संपूर्ण माहिती घेतो, उगाच समज गैरसमज नको, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.
विधानभवनात असूनही या पत्राबद्दल काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिल्यामुळे अविश्वास ठरावावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येतंय.