मुंबई : बुरखाबंदीवरुन शिवसेनेतील टोकाचे मतभेद समोर आले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून बुरखाबंदीची भूमिका मांडत, श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखाबंदी कधी अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. मात्र, त्यानंतर तात्काळ ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. त्यामुळे या विषयावर शिवसेनेत दुफळी तयार झाल्याचे दिसत आहे.
आजच्या सामना वृत्तपत्रात श्रीलंका सरकारच्या बुरखाबंदीच्या निर्णयाप्रमाणे भारतातही राष्ट्रीय सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ‘सामना’ अग्रलेखातून मांडण्यात आलेली भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. त्यावरुन ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत, थेट महिला नेत्यांनी तरी याबाबतचं समर्थन करु नये, अशी भूमिका मांडली. त्यामुळे बुरखाबंदीवरुन शिवसेनेतील दोन दिग्गज नेतेच आमने सामने आल्याचं दिसून येतं.
‘सामनाच्या संपादकीय भूमिका ना चर्चेतून आली, ना आदेशातून’
निलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतिमत: ठरतात. आजची दैनिक सामनाच्या संपादकीय भूमिका ना चर्चेतून आली, ना आदेशातून. त्यामुळे कदाचित हे चालु घडामोडींवर वैयक्तिक मत असेल. ती शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका नाही.”
‘याचे समर्थन महिला नेत्यांनी तरी करु नये’
यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितले, “बुरखा बंदीची मागणी शिवसेची नाहीच. श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आलेली ती परखड भूमिका आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हीच भूमिका ठामपणे घेतली आहे. तिहेरी तलाकला विरोध आणि बुरखा बंदी नको, याचे समर्थन महिला नेत्यांनी तरी करु नये.”
‘भारत सरकारनेही बुरखा बंदीचा निर्णय घ्यावा’
दरम्यान, बुरखा बंदी राष्ट्र सुरक्षेशी निगडित असून धर्माशी नाही. राष्ट्रहितासाठी सुरक्षा महत्वाची आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. श्रीलंकेमध्ये यावर कायद्याने बंदी घातल्यानंतर भारतासारख्या देशांमध्ये अशी भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी आजच्या सामना अग्रलेखात व्यक्त केले होते. राऊत म्हणाले, “श्रीलंकेमधील बॉम्बस्फोटांमध्ये व्यक्तींची ओळख झाल्याने बुरख्यावर कायद्याने पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय श्रीलंका सरकारने घेतला. त्यानंतर आता भारत सरकारनेही अशी भूमिका घ्यावी.”
निलम गोर्हे यांच्या या भूमिकेनंतर सामनातील संपादकीय लिखाण शिवसेना पक्ष प्रमुखांना विचारात न घेता लिहलं जातयं का? तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेता परस्पर अग्रलेख लिहिले जात आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आजच्या सामना अग्रलेखातील भूमिकेमुळे उद्धव ठाकरे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा आहे.
संबंधित बातम्या
रावणाच्या लंकेत बुरखाबंदी, रामाच्या देशात कधी? शिवसेनेचा सवाल