नवी दिल्ली : काँग्रेसच्या सोशल मीडिया विंगच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्विटरला रामराम केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. भाजप नेत्या आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिव्या स्पंदना यांनी ट्विटरवरुन सीतारामण यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर लगेचच स्पंदना यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर स्पंदना या सोशल मीडियापासून काही काळ लांब होत्या. त्याशिवाय त्यांनी ट्विटरवर निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीदरम्यान केलेले सर्व ट्विटही डिलीट केले आहे.
Divya Spandana tweets deleted, has she left Congress social media?
Read @ANI story | https://t.co/ONmJLaMLcG pic.twitter.com/UqjmRbmr6y
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2019
दरम्यान आज 2 जून रोजी स्पंदना यांचं ट्विटरवरुन अकाऊंट गायब झालं आहे. यानंतर दिव्या स्पंदना या काँग्रेस सोशल मीडियाच्या प्रमुखपदी नसल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख दिव्या यांनी 31 मे रोजी शेवटचं ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये भाजप नेत्या निर्मला सीतारामण यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. निर्मला सीतारामण या अर्थमंत्री पदाचा कारभार स्वीकारणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सर्व महिलांना यावर अभिमान आहे, असं ट्विट दिव्या स्पंदना यांनी केलं होतं
गेल्या काही महिन्यांपासून दिव्या या राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील खात्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. दिव्या यांनी हा कारभार हाती घेतल्यापासून राहुल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारच्या कारभारावर अचूक आणि प्रभावी पद्धतीने निशाणा साधण्याचे प्रमाण वाढले होते. अनेकांकडून या बदलाचे स्वागतही करण्यात आले होते. मात्र याता स्पंदना यांचे ट्वीटर अकाऊंट बंद झाल्याने त्या काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.