मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळात वर्णी न लागलेले शिवसेनेचे माजी परिवहन मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र रावतेंनी नाराजीचं काही कारणच नसल्याचं सांगत सर्व चर्चा (Diwakar Raote on Unhappiness) धुडकावून लावल्या आहेत.
मी निष्ठावान शिवसैनिक आहे, आणि कायमच राहीन. माझ्या नेतृत्वाने दिलेल्या आदेशांचं मी नेहमी पालन करत आलो आहे. मी मंत्रिमंडळ विस्तारावेळीही हजर होतो आणि शपथविधीलाही उपस्थित राहिलो होतो. त्यामुळे नाराज असण्याचं काही कारणच नाही, असं दिवाकर रावते यांनी ‘एएनआय’शी बोलताना स्पष्ट केलं.
दिवाकर रावते हे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. फडणवीस सरकारमध्ये रावते यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी होती. मात्र ठाकरे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी देण्यात आलेली नाही.
Shiv Sena MLC Diwakar Raote on reports that he is unhappy on not being made a Minister: I’m loyal Shiv Sainik&will always be.I obey the orders give by my leadership.I was there in oath ceremony also during the cabinet expansion. No question of being unhappy with party. (File pic) pic.twitter.com/AWtBLz45ZO
— ANI (@ANI) January 2, 2020
विधानपरिषदेवरील आमदारांना मंत्रिपद देऊ नये, अशी ओरड शिवसेनेतून होत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर अनिल परब आणि सुभाष देसाई वगळता विधानसभेतील आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं.
पक्षाला आमची लायकी वाटत नसेल : प्रताप सरनाईक
त्याच वेळी फडणवीसांच्या कार्यकाळात मंत्रिपद भोगलेल्या दिवाकर रावते, दीपक सावंत, रविंद्र वायकर, तानाजी सावंत, दीपक केसरकर, रामदास कदम यांना डावललं आहे. त्यामुळे या नेत्यांच्या मनात खदखदत असल्याचं बोललं जात होतं.
पक्षाला आमची लायकी नाही, असं वाटलं असेल, तर आम्ही दखल घेण्यास भाग पाडू आणि मंत्रिपद मिळवू, अशा शब्दात ठाण्यातील दिग्गज नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली होती.
सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राऊत बंधू नाराज असल्याच्या चर्चा होत्या. (Diwakar Raote on Unhappiness)