मुंबई : अनधिकृत बॅनरबाजीविरोधात आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पावलं उचलली आहेत. अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावू नका, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे, अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या बॅनरवर आणि कमानींवर मुख्यमंत्र्याचा फोटो न लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
अनधिकृत होर्डिंग, बॅनर न लावण्याबाबत मुख्यमंत्र्यानी थेट पत्रातून सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केलं आहे. जर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, कमानी लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर पक्षातर्फे शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सहीनिशी हे पत्र भाजपच्या सर्व कार्यलयात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रात सार्वजनिक ठिकाणी बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांची परवानगी असणे गरजेचे आहे. होर्डिंग उभारण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जर परवानगीशिवाय कुणी बॅनर, होर्डिगं लावले किंवा नियमांचे उल्लघंन केले, तर पक्षातर्फे कारवाई केली जाईल आणि पदावरुन निलंबित केले जाईल, असा थेट इशारा भाजपकडून या पत्रातून देण्यात आला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्याच्या या पत्रामुळे सध्या भाजप कार्यकर्तेही बॅनर आणि होर्डिंग लावण्याच्या संभ्रमात असल्याचे दिसत आहे, तर अनेकांनी मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाचे स्वागत करत समर्थन केले आहे.