गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्याच्याशी संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवार तरी सहमत आहेत का? तुम्ही शिवरायांच्या भूमीत जन्म घेतलाय, गप्प राहू नका, असं आवाहन करत मोदींनी शरद पवारांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं.
काँग्रेसने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणारी अनेक आश्वासनं आहेत. त्यावरुन भाजप सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहे. शिवाय काँग्रेसच्या मित्रपक्षांनाही याबाबत जाब विचारत आहे. आमची सत्ता आल्यास देशद्रोह हा गुन्हा नसेल, असं आश्वासन काँग्रेसने दिलंय. देशाविरोधात कृत्य करणारांना तुम्ही सहन करणार का? असाही सवाल मोदींनी केला.
काँग्रेसचा जाहीरनामा हा पाकिस्तानचं योजनापत्र आहे, काँग्रेसचा जाहीरनामा जवानांचं मनोबल कमी करणारा आहे. या महामिलावट करणारांना थोडीही संधी मिळाली तर नक्षल आणि दहशतवादी आंदोलनांना आणखी गती मिळेल. कुणी देशद्रोह केला तरी त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होणार नाही हे काँग्रेसने जाहीर केलंय, यामुळे देशाची परिस्थिती काय होईल? देशाचे संरक्षण मंत्री राहिलेल्या शरद पवारांना विचारायचंय, तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहात का? तुमचा जन्म शिवरायांच्या भूमीत झालाय, गप्प का बसता? असा सवालही मोदींनी केला.
यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच पाच वर्षे गेली, असं सांगत तुमच्या सहकार्याने विकासाचा नवा मार्ग तयार होईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. ‘दिल्लीत एसीमध्ये बसलेले लोक रोज नव्या गोष्टी सांगत आहेत. मोदीचं नाव घेतलं की त्यांची झोप उडते. लोक बालाकोट विसरले असं ते म्हणत आहेत. त्यांना मला सांगायचंय की हा देश अजून 1962 चं युद्ध विसरलेला नाही तर बालाकोट कसा विसरेल’, असंही मोदी म्हणाले.
मोदींचं संपूर्ण भाषण
जाहीरनाम्यात काँग्रेसचे कायद्यासंदर्भातील नऊ आश्वासने