अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 13 डिसेंबर 2023 : विधानसभा अध्यक्षांकडे साक्ष नोंदवण्यासाठी जात असताना कुणी तरी माझा पाठलाग करत होतं, अशी धक्कादायक माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर यांच्या या विधानाची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. उंदराचा कुणी पाठलाग करतं का? असा सवाल करतानाच हे पळपुटे उंदीर आहेत. शिवसेना सोडून बिळात लपले आहेत, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
उंदरांचा कुणी पाठलाग करतं का? उंदिराच्या मागे मांजर लागली तर मांजर उंदराला खाऊन टाकते. हे आमच्याकडे आलेले पळपुटे उंदीर होते. हे बिळात लपले कधी कोपऱ्यात लपले. पळून गेले. यांना कोण विचारतं? यांचा कोण पाठलाग करणार? हे कोण आहेत? हे कधी या बिळात, कधी त्या बिळात. त्यांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी नाय पराभूत झाले तर बघा, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.
कमळ प्रभावी चिन्ह असल्याने त्या चिन्हावरच निवडणूक लढली जावी, असं शिंदे गटाच्या खासदारांना वाटत आहे. याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभावी वाटतं. यातच त्यांचं ढोंग उघडं पडलं आहे. शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भाजपने जे कारस्थान केलं ते यातून उघड झालं आहे. हे कमळाबाईचे गुलाम आहेत. कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे. त्यांना शिवसेना धनुष्यबाण दिलं असलं तरी शिंदे गटाच्या कोणत्याही उमेदवाराला डिपॉझिट वाचवता येणार नाही. याची खात्री असल्यानेच त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? जे म्हणत होते धनुष्यबाण आमचा शिवसेना आमची ते कमळाबाईचे गुलाम बनत आहेत, अशी टीका संजय राऊत याांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र गैरसमजुतीतून लिहिलं होतं, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यावरून राऊत यांनी हल्ला चढवला आहे. प्रफुल्ल पटेल यांना वाचवण्यासाठी ही सारवासारव सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांचा मिर्चीचा ठेचा बाहेर आला. त्यानंतर आमच्याकडून झटका लागला. त्यानंतर सारवासारव सुरू झाली. मलिकांना एक न्याय आणि पटेलांना एक न्याय याला ढोंग म्हणतात. दोघांवरील आरोप सारखेच आहेत. दोघांवर दाऊदबाबतचे आरोप आहेत. पण तुम्ही मलिक यांना अस्पृश्य करत आहात. आणि पटेल यांच्याशी पीएम मोदी आणि अमित शाह गळाभेट घेत आहेत. हा आक्षेप आहे, असं राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीवरही त्यांनी भाष्य केलं. 19 तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक होणार आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जातील. इतरही सगळेच त्यामध्ये उपस्थित असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोणाला मुख्यमंत्री करायचे, कोणाला नाही तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवले जाते, त्यात ऑब्जेक्शन असण्याचा काही प्रश्न नाही. मध्यप्रदेशमध्ये पार्टीला वाटलं नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे ते देत आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. शिंदे नवीन असताना मुख्यमंत्री बनवलं, असा चिमटा त्यांनी काढला.
विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात या रोहित पवार यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रोहित पवार यांच्याकडे माहिती असेल. मला असं वाटत नाही की विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे सत्ता सोडण्याचा निर्णय घेतील. ते घटनात्मक पद आहे. भाजपने दिलेले ते सत्तेचे पद आहे, असं ते म्हणाले.