संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Central election Commission) शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By poll Election) वापरण्यास दिलं आहे.या नावाला ठाकरे गटाचा (Thackeray) विरोध असल्याचं बोललं जातंय. दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेतून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जावी, अशी मागणी ठाकरे गटाने केलीय. या याचिकेत शिंदे गटाच्या नावाचा उल्लेख केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. बाळासाहेबांच्या नावाबाबत ठाकरे गट कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती समोर आलीय.
ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. खरंतर कालच या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. पण काल ही सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, आज नेमकं या सुनावणीदरम्यान, काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरेंच्या वतीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत शिंदे गटानेही सावध पवित्रा घेतला आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली हायकोर्टात एक कॅव्हेटही शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलंय.
हाती घेऊ “मशाल” रे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निशाणी : मशाल pic.twitter.com/ryPOTMikxX— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 10, 2022
निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं होतं. सोमवारी दोन्ही गटांना नवी नावं देण्यात आली. त्यानंतर ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं आहे. तस मशाल हे निवडणूक चिन्हही दिलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. तर चिन्हाबाबत तीन पर्यात आज शिंदे गटाकडून पुन्हा निवडणूक आयोगाला दिले जाणार असल्याचं कळतंय.