भारतीय भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत : डोनाल्ड ट्रम्प

| Updated on: May 25, 2019 | 12:04 PM

Donald Trump congratulates PM Narendra Modi मुंबई : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत मोदी सरकार सत्तेत आलं आहे. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या या अभूतपूर्व यशानंतर जगभरातील नेते मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. भारतीय भाग्यशाली आहेत, कारण […]

भारतीय भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत : डोनाल्ड ट्रम्प
Follow us on

Donald Trump congratulates PM Narendra Modi मुंबई : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत मोदी सरकार सत्तेत आलं आहे. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या या अभूतपूर्व यशानंतर जगभरातील नेते मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. भारतीय भाग्यशाली आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत, असं ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत, नरेंद्र मोदींना विजयाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. “नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बातचीत झाली. मोठ्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. ते महान आहेत आणि ते भारतीयांचे नेते आहेत. भारतीय नागरिक भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत” असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या शुभेच्छानंतर नरेंद्र मोदी यांनीही त्यांना रिप्लाय देत, आभार व्यक्त केलं. मोदी म्हणाले, “धन्यवाद ट्रम्प. तुमच्यासारख्या भारताच्या खऱ्या मित्रांकडून शुभेच्छा मिळणं हे अमूल्य आहे”, असं मोदी म्हणाले.

जगाचं लक्ष भारताकडे

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत मोदी सरकार सत्तेत आलं आहे. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे जगाचं लक्ष भारताकडे लागलं आहे. मोदींनी पुन्हा एकदा बहुमत मिळवल्यानंतर जगभरातील नेत्यांनी मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव केला. जगाच्या दुष्टीने भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

अब्जावधी रुपयांची परदेशी गुंतवणूक, आयात आणि निर्यात भारतासारख्या बलाढ्या आणि 125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशासोबत होतं असते. त्यामुळे पुन्हा एकदा भारतात कोणाची सत्ता येणार आणि भारताचं नेतृत्व कोण करणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष होतं. मात्र मोदींच्या विजयानंतर जगातील सर्वच बलाढ्य देशांनी मोदींच्या विजयाचं स्वागत करत
पंतप्रधान मोदींसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे.

याआधी मोदी हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा किंवा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना माझे मित्र असं संबोधत होते. मात्र आता या जगभरातील नेत्यांनी हॅलो…मोदी…माय फ्रेंड असं म्हणायला सुरूवात केली आहे. याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे मोदींचे चांगले मित्र मानले जाणारे इस्रायलचे पंतप्रधान  बेंजामिन नेत्यान्याहू यांनी तर चक्क हिंदीतून मोदींना शुभेच्छा दिल्या.

माझे मित्र नरेंद्र मोदी, निवडणुकीतील प्रभावशाली विजयाबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. हे लोकसभेचे निकाल देशातील सर्वात मोठी लोकशाहीतील आपलं नेतृत्व सिद्ध करत आहेत. आपण एकत्र येऊन भारत आणि इस्रायलमधील मैत्री आणखी दृढ होण्यासाठी प्रयत्न करत राहू. खूपच छान..माझ्या मित्रा, असं नेत्यान्याहू म्हणाले.

इस्रायलशिवाय भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या जपान आणि रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनीही मोदींचं अभिनंदन आणि कौतुक केलं. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी फोन करुन मोदींना दणदणीत विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांनी लोकसभेतील विजयाबाबत मोदी आणि भाजपला शुभेच्छा संदेश पाठवला.

भारताचा आणखी एक पारंपरिक मित्र अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गणी यांनीही ट्विट करुन मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय लोकांकडून मिळालेल्या या बहुमतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. अफगाणिस्तानचं सरकार आणि इथले लोक दोन्ही लोकशाहींमधील सहाय्याचा विस्तार करण्यासाठी तत्पर आहेत, असं अश्रफ गणी म्हणाले.

तर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारात भारताचा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या चीननेदेखील मोदींच्या विजयाची दखल घेतली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मोदींचं विजयाबद्दल अभिनंदन केलं.

लोकसभा निवडणुकीआधी भारतात मोदीच पुन्हा जिंकून यावेत अशी इच्छा व्यक्त करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या.

भाजप आणि मित्रपक्षांच्या निवडणुकीतील विजयाबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो. दक्षिण आशियातील शांती, प्रगती आणि संपन्नतेसाठी त्यांच्यासोबत असंच काम करत राहू, असं इम्रान खान म्हणाले.

भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनीही पंतप्रधान मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात….ते लिहतात
तुमच्या जबरदस्त विजयाबद्दल खूप अभिनंदन. येत्या वर्षात अमेरिका आपल्या राजनैतिक भागीदारासोबत काम करण्यासाठी तयार आहे.

श्रीलंकाचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्वीट करत मोदींचं अभिनंदन केलं. ते म्हणतात, “जबरदस्त यशाबद्दल मोदींचे अभिनंदन. दोन्ही देशांच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करु”.

भारताच्या शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नाग्याल वांगचुक यांनीही फोनवरुन मोदींना शुभेच्छा दिल्या. तर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही शुभेच्छा संदेश पाठवून मोदींचे अभिनंदन केलं. अबूधाबीचे राजे शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनीही मोदींना शुभेच्छा पाठवल्या.

एकूणच काय दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत मोदीच पंतप्रधान होणार असल्यानं संपूर्ण जगात फक्त मोदींचाच डंका आहे. जगाच्या दृष्टीनं मोदी हे भारतातील सर्वात शक्तीशाली नेते ठरले आहेत.