पुणे: माझी जात विचारु नका मी छत्रपतींचा मावळा आहे, असं प्रत्युत्तर शिवसेनेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलं. ते जुन्नरमध्ये बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही तर माळी म्हणून निवडणुकांच्या मैदानात उतरवत आहे अशी टीका शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी केली होती. त्याला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं.
ज्या गोष्टीत माझं कोणतंही कॉन्ट्रिब्यूशन नाही, त्या गोष्टीत कोणताही अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे माझी जात घ्यायची असेल तर लिहून घ्या, माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या तीन अक्षरामध्ये अठरा पगड जातींचा समावेश होतो, या तीन अक्षरी शब्दांमध्ये सगळ्या पंथांचा, सगळ्या प्रांतांचा समावेश होतो आणि हा तीन अक्षरी शब्द एकच प्रेरणा देतात ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची- अमोल कोल्हे
शिरुर मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, आजपर्यंत सलग तीनवेळा शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले आहेत. आजपर्यंत एकाच पक्षात असलेले पाटील आणि अभिनेते कोल्हे हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. मात्र नुकतंच अमोल कोल्हेंनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधल्यानं एकेकाळचे दोस्तच आता दुश्मन बनले आहेत.
आजपर्यंत शिरुरचा गड हाती न आल्यानं आता राष्ट्रावादीने अमोल कोल्हेंना गळाला लावून अर्धी मोहीम तर फत्ते केली, आता लोकसभेला कोल्हेंच्या रूपात राष्ट्रवादी नवा उमेदवार देतंय का याकडंच साऱ्यांच लक्ष आहे.
या सर्व घडामोडीतच माझी जात विचारु नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं. माझी जात म्हणजे मी छत्रपतींचा मावळा हीच आहे असं अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्वतःचा उल्लेख छत्रपतींचा मावळा असा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही तर माळी म्हणून निवडणुकांच्या मैदानात उतरवत आहे अशी टीका शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी माझी जात विचारू नका मी शिवरायांचा मावळा आहे असं म्हटलं. तसेच आपल्या जुन्नर येथील भाषणात अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.
नुकत्याच झालेल्या एअर स्ट्राईकवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सर्जिकल स्ट्राईक नेमका कधी झाला ते माहित नाही, पण पेट्रोल डिझेलची दरवाढ मात्र नक्की झाली असं अमोल कोल्हे म्हणाले.
दुसरीकडे ‘माझ्या संभाजी आणि शिवाजीच्या भूमिकेतील फोटो कोणत्याही फ्लेक्सवर वापरू नका” असं आवाहनही यावेळी कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
कितीही कोल्हेकुई करा, विजय माझाच – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
शिरुर लोकसभा मतदारसंघात कुणी कितीही कोल्हेकुई केली, तरी निवडणूक आपण जिंकणारच असा विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर शिवाजीराव पाटलांनी हा टोला लगावला.