मुंबई : नीरा पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नीरा डाव्या कालव्यातून बारामातीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सरकारला पाण्यावर राजकारण करु नका, असा सल्ला दिला. आता उद्धव ठाकरेंनीही पवारांच्या सुरात सूर मिसळत पाण्यावर राजकारण करु नये असे म्हटले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पवारांना शह देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पवारांनीही सरकारले सुनावले. शरद पवार म्हणाले, “पाण्यावरुन राजकारण करु नये. कुठे राजकारण करावे आणि कुठे करु नये याचं भान राखलं पाहिजे. तालुक्या-तालुक्यात वाद नको.”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “माणूस अनेक गोष्टी तयार करु शकतो, मात्र पाणी नाही. जे पाणी आपल्याकडे शिल्लक आहे त्याचा वापर जपून केला पाहिजे. जेथे दुष्काळ आहे तेथे सरकार योजना देत आहे. त्यामुळे यात राजकारण करु नये.”
काय आहे पाणी प्रश्न?
वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.
नियमबाह्य पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.
जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारं पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना 100 टक्के होणार आहे.