कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले नऊ खासदार आणि 22 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीबाबत जागा वाटपाच्या कोणत्याही फॉर्मुल्यावर चर्चा झालेली नाही. कोणताही फॉर्मुला तयार झालेला नाही. मात्र, आत्ता खासदारकीच्या जागा आमच्याकडे जास्त आहेत. त्यामुळे आमच्या जागा कायम ठेवून शिल्लक जागा समान ठेवायच्या असा फॉर्मुला झाल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. तसेच काही जागांची अदलाबदली देखील होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकचा फॉर्मुला महाराष्ट्रात लागू होणार नाही असे म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचाच फॉर्म्युला आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला चालणार आणि पुन्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या शिवशाहीची राजवट येणार.
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाची चिंता करू नये. आधी तुमची परिस्थिती पहा. एक ना धड भाराभर चिंद्या अशी तुमची परिस्थिती आहे. मिंदे गटाला सोबत घेतल्यापासून तुमची पनवती सुरू आहे त्याची आधी काळजी करावी असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर भाजप आमदार नितेश राणे दररोज टीका करत आहे यावर राऊत यांनी म्हटले की, त्याला आम्ही किंमत देत नाही. तो टिनपाट माणूस आहे. नितेश राणे फक्त भुंकतो. भूंकण्यासाठीच भाजुन त्याला पाळले आहे आणि भुंकणारा कुत्रा चावत नसतो.
ज्या पद्धतीने शिंदे गटाचा असंतोष उफाळून येत आहे. ज्या पद्धतीने आमदारांना 50 खोके आणि शंभर कोटीची विकास कामे अशी आमिषी दाखवून आम्हाला जवळ घेतले. पण, तशी कामे होत नाही. विकास कामांच्या बाबतीत जवळ घेतलं नाही ह्या असंतोष शिंदे गटाच्या आमदारात आहे. तो लवकरच उफाळून येईल. ज्यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं त्यांचे पितळ उघडे पडणार आहे.
मिंदे गटाचे 22 आमदार आणि नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत. पण, गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाही असे मोठे विधान खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच, महाविकासीत आघाडीत एका कुटुंबात भांड्याला भांडे लागले तरी भांडे फुटू देणार नाही याची दक्षता महाविकास आघाडीचे नेते नक्कीच घेतील विश्वासही त्यांनी व्यक्त केला.