मुंबई : समाजात स्त्रियांना बंधनात ठेऊ पाहणाऱ्या आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आंधळ्या आणि वैचारिक कॅन्सर झालेल्या सरकारशी सामना करावा लागेल, असं मत जागतिक भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी व्यक्त केलं (Dr Ganesh Devy on thoughts against women). राष्ट्र सेवा दलाच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राज्यभरात ‘सावित्री उत्सव’ साजरा करण्यात येतो. याचाच भाग म्हणून मुंबईत आयोजित ‘सावित्री उत्सव 2020’ कार्यक्रमात गणेश देवी बोलत होते.
पद्मश्री डॉ. गणेश देवी म्हणाले, “नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या मोर्चात सहभागी झाल्याने उत्तरप्रदेश सरकारने 13 महिन्यांच्या तान्ह्या बाळाच्या आईला तुरुंगात डांबले. यावरुन तेथील सरकार आंधळं झाल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे कुटुंबात पुरुषानेच कमावतं असावं आणि महिलांनी कुटुंब सांभाळावा, असा आग्रह धरतात. यावरून आजही हजारो वर्षांपूर्वीचा वैचारिक कॅन्सर आपल्यात असल्याचं उघड होतं. त्यामुळे आपल्याला सरकारच्या या आंधळ्या आणि कॅन्सरयुक्त प्रवृत्तीशी लढावं लागेल.”
जगभरात समाजाला अंधारात ढकलू पाहणाऱ्या सरकारांचा उदय होत असल्याचं निरीक्षण नोंदवतानाच देवी यांनी उपस्थितांना याबाबत वेळीच सावध होण्याचा इशारा दिला. मी बडोद्यात मी काम केलं. तेथे सयाजीराव महाराजांनी स्वातंत्र्य लढ्याला मदत केली. कारण त्यांनी ज्योतिबा आणि सावित्रीचा विचार स्वीकारला होता. सयाजी महाराजांनी ज्या गावात 7 मुली असतील तेथे शाळा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या कृतीतून फुलेंचा विचार जपला आणि जगला. मात्र, आज आपले सरकार याच्या उलट काम करत आहे, असंही गणेश देवी यांनी नमूद केलं.
“समाजाने सावित्रीबाईंच्या अंगावर दगड शेण फेकलं, मात्र सावित्रीबाईंनी समाजावर स्वप्न फेकली”
गणेश देवी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कामाचा उल्लेख करताना त्याचं महत्वाची विशद केलं. ते म्हणाले, “ज्या समाजाने सवित्रीबाईंवर दगड फेकली, त्यांच्यावर सावित्रीबाईंनी शिकून मोठं होण्याची, पुढे जाण्याची स्वप्न फेकली. त्याचंच प्रतिक म्हणून पुढील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपण लहान मुलांनी रंगवलेली रंगीत दगडं घरोघरी वाटायला हवीत.”
राष्ट्र सेवा दल, मुंबईचे अध्यक्ष शरद कदम यांनी सावित्री उत्सवाने स्त्रियांना व्यक्त होण्याचं हक्काचं विचारपीठ दिल्याचं नमूद केलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. त्यांनी देखील सावित्रीचा हा उत्सव आपण महाराष्ट्रात पोहचतो असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला. शाहीर संभाजी भगत यांनी येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी निकराचा लढा द्यावा लागेल असं मत व्यक्त केलं.
राज्यभरात सावित्री उत्सवाला भरभरून प्रतिसाद
मुंबईत राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या सावित्री उत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात महिला आणि तरुण मुली आणि मुलांची उपस्थिती चांगली होती. सुरुवातीला प्रत्येकाचे चाफ्याचे फुल आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच ‘सावित्री जोती’ या मालिकेच्या निमित्ताने सोनी मराठी ने प्रसिद्ध केलेले कॅलेंडर सर्वांना भेट देण्यात आले.
राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ.गणेश देवी, डॉ. तात्याराव लहाने,लोकशाहीर संभाजी भगत,नंदकुमार इनामदार,अरविंद पार्सेकर,राष्ट्र सेवा दल,मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम व्यासपीठावर उपस्थित होते. सावित्रीच्या लेकी पुरस्कार डॉ.रागिणी पारेख आणि श्रीमती सविता गोस्वामी यांना डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते देण्यात आला.यानंतर त्यांच्याशी आकाशवाणीच्या उमा दीक्षित यांनी गप्पा मारल्या. राष्ट्र सेवा दलाच्या गोरेगाव,सातरस्ता,चेंबूर आणि मालवणी,मालाड केंद्राला संघटनात्मक पुरस्कार डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते देण्यात आला.
सुरवातीला गोरेगाव व मालवणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्य व नृत्य सादर केले. शेवटी ६ जानेवारीपासून सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या सावित्री जोती या मालिकेच्या पहिल्या भागाची काही चित्रे दाखविण्यात आली. सूत्र संचलन उल्का पुरोहित यांनी केले.
राष्ट्र सेवा दलाकडून महिलांना कपाळावर आडवी चिरी लावून सावित्रीबाईंचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व यावर मतं व्यक्त करण्याचं आवाहन करण्यात आलं. यावर हजारो तरुण मुली, स्त्रिया, मालिका, सिनेमामध्ये अभिनय करणाऱ्या स्त्रियांनी आपली मतं नोंदवली. सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या.