उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला (NCP Shivswarajya Yatra ) पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील (Dr Padmasinh Patil) आणि त्यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राणा पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. डॉ पाटील परिवारातील पिता-पुत्र बरोबरच सून जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील आणिनातू मल्हार पाटील यापैकी एकही जण या शिवस्वराज्य यात्रेला हजर नव्हता.
एकीकडे आमदार राणा पाटील शिवस्वराज्य यात्रेत गैरहजर आहेत, तर दुसरीकडे त्यांनी फेसबुकवर सरकारच्या कौतुकाच्या पोस्ट केली आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या निर्णयाचे पोस्ट करून कौतुक केले आहे . RTE अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश शाळांनीच देण्याच्या निर्णयाचे आमदार राणांनी कौतुक केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी येथे झालेल्या सभेला खासदार अमोल कोल्हे , जयंत पाटील,आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे उपस्थित होते .
डॉ पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे नातेवाईक आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच डॉ पाटील पिता- पुत्र आणि त्यांच्या परिवारातील एकही सदस्य राष्ट्रवादीच्या कार्यक्रमला हजर नव्हता.
उस्मानबाद विधानसभांचं गणित
उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विधानसभांपैकी उस्मानाबाद आणि परांडा हे राष्ट्रवादीचे 2 मतदारसंघ आहेत. त्यात डॉ. पाटील आणि त्यांचे नातलग असलेल्या मोटे परिवाराची सत्ता आहे. डॉ. पाटील परिवारात 36 वर्षे, तर मोटे परिवारात 25 वर्षांपासून आमदारकी आहे. पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा या मतदारसंघात होत आहे. अशात बदलत्या समीकरणांमुळे आमदार मोटे यांना पक्षीय स्तरावर बळ देण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आमदार मोटे यांनी मोदी लाटेतही 2014 साली परंडा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली. यावेळी ते विजयी चौकार मारण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत.
संबंधित बातम्या
डॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल