लखनौ : बिजनौर मतदारसंघात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये आज मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे बिजनौरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र प्रियांका गांधी यांनी घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडे पाहून हसत त्यांच्या अंगावर फूले फेकली. प्रियांका गांधी काँग्रेस उमेदवार नसीमुद्दीन सिद्दिकी यांच्या प्रचारासाठी बिजनौरमध्ये दाखल झाल्या होत्या.
काँग्रेस कार्यकर्ते ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी करत होते. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदींच्या घोषणा दिल्या. त्यामुळे हा वाद पाहायला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बिजनौरमध्ये 11 एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून नसीमुद्दीन सिद्दीकी, तर भाजपकडून कुंवर भारतेंद्र सिंह आणि बसपाकडून मलूक नागर उभे आहेत.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या मतदारसंघात येणार होते. इथे रॅली आणि सभेचं आयोजन केले होते. मात्र खराब वातावरण असल्यामुळे प्रियांका गांधींनी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्योसोबत रोड शोचे आयोजन केले. बिजनौरच्या व्यतिरिक्त प्रियांका गांधी यांनी आज सहारनपूरमध्ये निवडणूक सभा घेतली होती. सहारनपूरमध्ये काँग्रेसकडून इमरान मसूद उमेदवार आहेत. त्यांची लढत भाजपच्या नेतृत्वाखालील महाआघाडीसोबत होणार आहे. सहारनपूरच्या देवबंदमध्ये नुकतेच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आज संध्याकाळी 5 वाजता पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार थांबला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला देशातील 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशच्या 8 लोकसभा जागांचा समावेश आहे.