दिनेश दुखंडे, मुंबईः महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतल्या दसरा मेळाव्याकडे (Dussehra Melava) लागलंय. मुंबईत बीकेसी ग्राउंडवर (BKC ground) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. यासाठी बीकेसी ग्राउंडवर भव्य स्टेज उभारण्यात आलंय. विशेष म्हणजे या स्टेजवर एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं आसन असेल, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी या माहितीला दुजोरा दिलाय.
व्यासपीठावरील स्व. बाळासाहेब ठाकरेंसाठीचं हे आसन मेळाव्याचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे. आसनावर चाफ्याची फुले ठेवण्यात येणार आहेत.
अशा प्रकारे पुष्पांजली वाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण या दसरा मेळाव्यात कायम ठेवली जाईल, असं सांगण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्यासाठीची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र त्यांची आठवण ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून त्या मेळाव्यात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर येतील तेव्हा एका चाफ्याच्या फुलांचा हार या खुर्चीला घालतील, असं नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र फक्त आमच्याच मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंचे विचार दिसून येतील, असा दावा शिंदे गटामार्फत करण्यात येतोय.