मुंबईः महाराष्ट्रासाठी (Maharashtra politics) यंदाचा दसरा ऐतिहासिक आहे. इथं वर्षानुवर्षांच्या परंपरेला तडा गेलाय. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा दुभंगलेला दिसेल. राज्यातला महत्त्वाचा पक्ष असलेली शिवसेनाच (Shivsena) दुभंगली आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात. शिंदे गटाचा बीकेसीवर तर उद्धव गटाचा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर होतोय. दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी महाराष्ट्राचे शिवसैनिक कामाला लागलेत. गावा-गावांतून जथ्थे, यात्रा, रॅली मुंबईच्या दिशेने निघालेत. उद्या हजारो-लाखो लोक मुंबापुरीत (Mumbai) जमतील. दोन गटाच्या नेत्यांची परस्परांवर आगपाखड होईल. मनातले हेवे-दावे बाहेर निघतील. एकूणच मुंबईतलं राजकारण उद्या धुमसणारं असेल.
या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलीस तसेच राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
योगायोग हा की, महाराष्ट्राचा प्रभावी पक्ष शिवसेना फोडण्यासाठी जो भाजपा जबाबदार आहे, असं म्हटलं जातं. त्याच भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रचंड राजकीय करिश्मा दाखवणारे देवेंद्र फडणवीस हेच सध्या राज्याचे गृहमंत्री आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतील दोन गटांमध्ये शांततेचं वातावरण राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार असल्याने मुंबईतल्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या काळात समाज कंटकांनी स्थिती अस्थिर करू नये, याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असं फडणवीसांनी सांगितलं.
शिंदे आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठीची भाषणाची स्क्रिप्ट तर जवळपास तयारच असेल. पण भाषणादरम्यान, प्रक्षोभक वक्तव्ये आणि असंसदीय शब्द टाळावेत, यासाठी नियमांची यादी तयारच असते. अशा वेळी कायद्यानुसार, कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी म्हटलंय.