मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. त्यानंतर काँग्रेसने (Congress) आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठी राजकारण असल्याचा आरोप केला आहे. (ED has not been raided In the BJP-ruled state, Balasaheb Thorat slams BJP)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. आम्ही कायम यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय हे दुर्दैवी आहे.
भाजपच्या ऑपरेशन कमळबाबत बोलताना थोरात म्हणाले की, भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही. ईडीच्या छापेमारीमुळे कोणावरही दबाव येणार नाही. उलट लोक पक्के होतील. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करु. काहींना वाटत होतं हे सरकार फार काळ टिकणार नाही, सरकार पडेल. परंतु आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांनाही थोरात यांनी यावेळी टोला लगावला, थोरात म्हणाले की, दानवे जे काही बोलतायत, ते एक दिवास्वप्न आहे. त्यांनी ते दिवास्वपन पाहात राहावे.
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं : सचिन सावंत
प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंत म्हणाले की, “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”
” भाजप हीन पातळीचं राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने छापे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. गेल्या 6 वर्षात एकाही भाजप नेत्यावर ईडीने छापा का टाकला नाही? त्यांना का नोटीस नाही?”, असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले.
“सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपमध्ये प्रवेश दिले”, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
D raids on Pratap Sarnaik | ईडीची जय्यत तयारी, सरनाईकांवरील धाडीसाठी पुण्याहून खास फौजफाटा मागवला
प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन
(ED has not been raided In the BJP-ruled state, Balasaheb Thorat slams BJP)