हरियाणा राज्यातील महेंद्रगड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार राव दानसिंह यांच्या घरी आणि कंपनीवर ईडीने धाड टाकली आहे. आमदार राव दानसिंह आणि त्यांच्या मुलगा, सहकारी यांच्या दिल्ली, गुरुग्राम आणि जमशेदपूर येथील 16 जागांवर 18 जुलै रोजी सकाळी धाड घातली. ईडीने सतत तीन दिवस त्यांची चौकशी केली. अखेर ही धाड कारवाई रविवारी संपली. ईडीच्या तपासामध्ये कंपनी आणि आमदारांच्या बँक अकाऊंटमध्ये हेराफेरी झाल्याचे समोर आले. ईडीने केलेय या कारवाईत 1.42 कोटी रोख, काही महत्त्वाची कागदपत्रे, बेनामी 32 फ्लॅट, जमीन, अनेक लॉकर इतकी संपत्ती जप्त केली आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली मेसर्स एलाइड स्ट्रिप्स लि.चे संचालक गौरव अग्रवाल, मोहेंदर अग्रवाल आणि आमदार राव दानसिंह, त्यांचा मुलगा अक्षत सिंह यांच्या संस्था, कंपनीवर ईडीने धाड टाकली. याप्रकरणी सीबीआयकडे गुन्हा दाखल झाला होता. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांची अफरातफर, फसवणूक आणि कॅनरा बँकेला 1392 कोटींना गंडवल्याचा आरोप करण्यात आला होता.
राव दानसिंह आणि त्यांच्या मुलाने एएसएल कंपनीतून कर्ज घेतले. परंतु, त्याची परतफेड केली नाही. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकांकडून कोट्यवधीचे कर्ज लाटले. जमीन खरेदी करून गुंतवणूक केली. बँकांकडून घेतलेले कर्ज कंपन्यांमध्ये वापरले. हा सगळा व्यवहार बनावट कंपन्याच्या माध्यमातून करण्यात आला. त्या बदल्यात रोकड, जमीन खरेदी करणे आणि अन्य कामांत कर्जाचा पैसा गुंतवण्यात आला. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे ईडीने सांगितले.
हरियाणा विधानसभेत राव दानसिंह हे महेंद्रगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावर्षाच्या अखेरीला हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राव दानसिंह हे या मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमधून महेंद्रगड जागेवर निवडणूक लढवली होती. परंतु, भाजपाचे धर्मबीर सिंह यांनी त्यांचा 41 हजार मतांनी पराभव केला.