बारामती अ‍ॅग्रोवर ईडीच्या धाडी…सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया… म्हणाल्या, यात आश्चर्य…

| Updated on: Jan 05, 2024 | 4:14 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला न्याय दिला तर बरे आहे. सर्वांनाच माहिती आहे संविधान काय म्हणते , पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती सगळं करतेय.,त्यामुळे आता ही अदृश्य शक्ती करतंय की संविधान हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाने घ्यायचा आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

बारामती अ‍ॅग्रोवर ईडीच्या धाडी...सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया... म्हणाल्या, यात आश्चर्य...
Supriya Sule
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पुणे | 5 जानेवारी 2023 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे परदेशात असताना त्यांच्याशी संबंधित बारामती एग्रोवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडी आणि सीबीआयच्या चौकशी सुरु असलेले 95 टक्के लोक हे विरोधी पक्षातील आहेत. केंद्र सरकार विरोधकांवर धाडी टाकीत असून त्यातून बधले नाहीत तर भाजपाकडे वॉशिंग मशिन आहेच अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रजनी इंदुलकर, स्मिता पाटील आणि विजया पाटील या माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी लांब लांबपर्यंतचा संबंध नसताना त्यांच्यावर रेड झाल्या, त्यामुळे हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे अजितदादांमुळेच निवडून आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मागे म्हटले होते. तर बारामतीचा पुढचा खासदार महायुतीचाच असेल असेही त्यांनी म्हटले होते. सुप्रिया सुळे यांनी दहा महिने बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर चाकणकर यांनी ही टिका केली होती. आता सुप्रिया सुळे मतदार संघ बदलणार आहेत अशी चर्चा आहे. यावर आता बारामती मतदार संघ हा माझ्यासाठी मतदारसंघ नाही, तर कुटुंब आहे, गेल्या पंधरा वर्षात जेवढा वेळ मी माझ्या मुला आणि नवऱ्याबरोबर नाही घालवला नाही तेवढा वेळ मी या मतदारसंघात घालवला आहे. जी संधी मला या मतदारसंघातील नागरिकांनी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी राहील, परंतू तुम्ही माझे तिकीट का कापतायं? अशी प्रतिक्रीया सुळे यांनी दिली आहे.

भुजबळ साहेब माझ्या वडीलांच्या वयाचे

छगन भुजबळ यांनी अजित पवारांचीच री…ओढत शरद पवार यांनी आता आशीवार्द द्यावेत असे म्हटले आहे. तसेच पवार गट संपविण्याच्या कामाला जितेंद्र आव्हाड लागले आहेत. पवार यांनी महायुतीत यावे असेही म्हटले आहे. यावर प्रतिक्रीया विचारली असता सुप्रिया सुळे यांनी, छगन भुजबळ साहेब वयाने माझ्या वडीलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे वयाने जे मोठे आहेत त्यांच्याबद्दल कधी काही चुकीचं बोलायचं नाही, हे माझ्यावर झालेले संस्कार आहेत. त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब हे माझ्या वडिलांचे वयाचे आहेत.. जे काय ते बोलले आहेत ते बोलायचे त्यांना अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महानंद प्रकरणी भुजबळांचे आभार

भुजबळ यांनी सरकारमध्ये राहुनही महानंद डेअरीला गुजरातच्या ताब्यात देण्याच्या निर्णयावर आवाज उठवल्याने त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत आहोत असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मला आज आनंद वाटतो की या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये कोणीतरी बोलतंय आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार भुजबळ साहेबांचे काहीच ऐकत नाही. भुजबळ साहेब जे बोलत आहे त्यावरून असं वाटते की संजय राऊत जे बोलतात की कॅबिनेटमध्ये गॅंगवर आहे ते कदाचित खरं असेल असेही सुळे यांनी म्हटले आहे.

मी रामकृष्ण हरी वाली आहे

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम हे मासांहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रोहित पवारांनी त्यांना असे वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी जर रोहित पवारांना काही सल्ला दिला असेल. तर त्यात मला महत्त्वाचं एवढं काही वाटत नाही. कारण मी एक सुसंस्कृत, संस्कारी, मराठी भारतीय मुलगी आहे. मी राम स्वत: रामकृष्ण हरी वाली आहे, त्यामुळे माझ्या ओठात मनात, आणि हृदयात ही राम कृष्ण हरी आहे. माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. एखाद्याची भावना दुखावली असेल तर काल जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं मत स्पष्ट केले आहे. सगळ्यांच्या भावनांचा आपण सर्वांनीच मानसन्मान करावा असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.