मुंबई : मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरं आहे, असं म्हणत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse TV9) यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला बळ दिलं. एकनाथ खडसे (Eknath Khadse TV9) यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.
“पक्षाने माझं तिकीट का नाकारलं हे मला कळलं नाही. पक्षाला माझ्याबाबत कुठलाही आक्षेप नाही, मात्र कोअर कमिटीच्या मिटींगमध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मला तिकीट देण्यात आलं नाही. नाराजी काय आहे हे मला सांगण्यात आलेलं नाही, म्हणून मी त्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे कारवाईची मागणी केली आहे”, असं खडसे म्हणाले.
मी भाजप सोडू शकतो किंवा जाऊ शकतो असं म्हटलं नव्हतं, मी संन्यासही घेऊ शकतो, पक्षाने माझ्या मागणीची नोंद घेतली याचं समाधान आहे. मला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करणार, असंही खडसेंनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीसांचे आणि माझे संबंध बिघडलेलं नाही, आम्ही आजही बोलतो, पण मी स्पष्टवक्ता आहे, जे मनात आहे ते मी बोलतो. मला जे कळलं मी त्यावर व्यक्त झालो, त्यांची माझ्यावर नाराजी काय याचं कारण मला जाणून घ्यायचं आहे, याचा अर्थ असा नाही की मी फडणवीसांवर किंवा महाजनांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
तुम्हाला दुसऱ्या पक्षातील नेते चालतात, मग नाथाभाऊ का चालत नाही, याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. रोहिणी खडसेंना पाडण्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्याची नोंद पक्षाने घेतली आहे, असं खडसेंनी स्पष्ट केलं.
एकनाथ खडसे आमच्या संपर्कात : गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्ण तयारी झाल्याचं सांगत योग्य वेळी संख्याबळ सिद्ध करु, असं म्हटलं आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “महाविकासआघाडीची बैठक झाली. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. या निवडणुकीत आघाडीचाच उमेदवार असेल. निवडणुकीत आम्ही आमचं संख्याबळ सिद्ध करुन दाखवू. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. किती नेते संपर्कात आहेत हे मात्र आज सांगू शकत नाही. जिल्हा परिषदेसाठी आमची तयारी झाली आहे.”
संबंधित बातम्या
“युतीच्या काळात हातात चिमण्या मारण्याची बंदूक, आघाडीने थेट बॉम्बच दिला”