जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा झटका दिलाय. खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा (Bhosri Land Scam) प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागानं घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज न्यायालयात तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज (Application) सादर केला आहे. याबाबत न्यायालयाने 26 ऑगस्ट ही तारीख पुढील सुनावणीसाठी दिलीय. आता 26 तारखेला न्यायालय काय आदेश देणार हे पाहावं लागणार आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय, मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे. नाथाभाऊ हा राजकीय दृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होत असल्याची टीका खडसेंनी केलीय.
भोसरी प्रकरणाबाबत अनेकदा चौकशी झाली आहे. झोटिंग समितीनेही चौकशी केली आहे. पुण्याच्या अँटी करप्शन विभागानं चौकशी करुन या प्रकरणात तथ्य नाही. हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिलाय. ईडीकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे. नाथाभाऊ हा राजकीयदृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होते. नाथाभाऊ बाजूला झाला म्हणजे यांना रान मोकळं होईल. वारंवार छळण्याचा हा प्रकार आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. जनता हे सर्व पाहत आहे. भोसरी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. मी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. चुकीचं काम केलेलं नाही. भोसरी प्रकरणाची चौकशी कोणत्याही यंत्रणेने केली तरी काहीही तथ्य निघणार नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे. या देशाच्या विकासात, व्यापारात सर्वाचं योगदान आहे. राज्यपालांनी अशाप्रकारे भेदभाव करणं, जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणं दुर्दैवी आहे. महामहिम राज्यपालांकडून अशी अपेक्षा नाही. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायला हवं. हा एकप्रकारे मराठी माणसाचा अवमान आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे राज्यपालांनी हे आपलं व्यक्तिगत मत आहे, असं स्पष्ट करायला हवं, असंही खडसे म्हणाले.