जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद यात्रेनिमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राजकीय वैर विसरुन माजी आमदार मनिष जैन (Manish Jain) यांना वाढदिवसानिमित्त केक भरवून प्रेमाचे नवे पर्व सुरु केले. माजी आमदार मनिष जैन आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यात दीर्घ काळापासून सुरु असलेल्या राजकीय वैमनस्याची सांगता झाल्याची चर्चा आहे. (Eknath Khadse Manish Jain Family Political Enemy)
कोण आहेत मनिष जैन?
मनिष जैन हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. जळगावातील विख्यात आर. एल. ज्वेलर्सचे ते संचालकही आहेत. विधान परिषदेचे माजी सदस्य असलेले मनिष जैन सध्या राष्ट्रवादीत सक्रिय आहेत.
निखिल खडसेंच्या पराभवानंतर वाद टोकाला
2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनिष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरु झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला पोहोचला.
खडसेंचा जैन पिता-पुत्रावर घणाघात
ईश्वरलाल जैन राष्ट्रवादी, तर एकनाथ खडसे भाजपमध्ये असल्याने त्यांच्यात राजकीय मतभेद होतेच. या काळात खडसेंनी ईश्वरलाल जैन आणि मनिष जैन या पिता-पुत्रांच्या कथित गैरव्यवहारांबाबत अनेकदा भाष्य करत त्यांना जेलची हवा खावी लागणार, असा इशाराही दिला.
जैन यांना खुमखुमी अंगलट
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रावेर मतदारसंघातून मनिष जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. भाजपकडून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळालेली होती. अशात, ईश्वरलाल जैन यांनी ही निवडणूक खडसेंविरोधात असती तर मजा आली असती, असं वक्तव्य केले. खडसेंनी ते मनावर घेतलं. विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि प्रदेश भाजपातील महत्त्वाचे नेते म्हणून खडसेंच्या शब्दाखातर हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली. त्यांच्याऐवजी खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. (Eknath Khadse Manish Jain Family Political Enemy)
रक्षा खडसे विजयी झाल्यानंतर खडसे-जैन वैर सौम्य झाले. मनिष जैन यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच दोन-अडीच वर्षांच्या आमदारकीतून प्राप्त राजकीय कारकीर्द संपुष्टात आली.
एकनाथ खडसेंनी फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, 2019 मध्ये त्यांची उमेदवारी कापल्यानंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. तीन महिन्यांपूर्वीच खडसे राष्ट्रवादीत दाखल झाले. शरद पवारांच्याच उपस्थित झालेल्या प्रवेशानंतर खडसेंचे राष्ट्रवादीतील कट्टर विरोधक मनिष जैन, माजी आमदार संतोष चौधरी यांना जुळवून घ्यावे लागत आहे.
संबंधित बातम्या:
भाजप खासदार सूनबाईंकडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत
VIDEO | राजकीय वैर संपवत केक भरवला, मनिष जैन-एकनाथ खडसेंचे प्रेमाचे पर्व
(Eknath Khadse Manish Jain Family Political Enemy)