जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे आपल्या आवडत्या खासदार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं. त्यानंतर, चांगल्या कामाची दखल घेतली, तर राजकारणात चांगले दिवस येतील, अशा भावना एकनाथ खडसेंनी व्यक्त केल्या आहेत. (Eknath Khadse on Supriya Sule Praise)
‘रक्षा खडसे आणि सुप्रिया सुळे संसदेत एकत्र काम करतात. एकमेकांना सहकार्य करतात, त्यामुळे हे स्वाभाविकच आहे. राजकारण्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं आहे. सुप्रियाताईंनी चांगलं काम केलं. आम्ही त्यांचं नेहमी कौतुक करत आलेलो आहोत. काही गोष्टी या राजकारण्याच्या पलिकडच्या असतात. योग्य कामाची दखल घेतली पाहिजे. त्यात राजकारण आडवा येता कामा नये. चांगल्या कामाची जर दखल घेतली, तर राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ शकतात.’ असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.
दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? हा प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावचा आवाज संसदेत मांडणाऱ्या रक्षा खडसे आपल्या आवडत्या महिला खासदार असल्याचं सांगितलं होतं.
48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंवर स्तुतिसुमने उधळली होती. रक्षा खडसे या सलग दुसऱ्यांदा जळगावातून लोकसभेच्या खासदारपदी निवडून आल्या आहेत. (Eknath Khadse on Supriya Sule Praise)