जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. खडसेंच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात खडसे सुखरुप असून गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही. चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरुप आहोत, अशी माहिती खडसेंनी अपघातानंतर ट्विटरवरुन दिली. (Eknath Khadse reaction after Car Accident in Jalgaon)
गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौर्यात अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील देशमुख यांच्यासोबत होते.
अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते. धरणगावपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यानंतर कार चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही.
“आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावनजीक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्यामुळे, तसेच चालकाचे प्रसंगावधान आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरुप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही” अशी माहिती खडसेंनी ट्विटरवरुन दिली.
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 1, 2020
याआधी, एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत एकाच गाडीने नंदुरबार दौरा पूर्ण केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळेस गृहमंत्र्यांसोबत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश
गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. (Eknath Khadse reaction after Car Accident in Jalgaon)
एकनाथ खडसे यांनी 21 ऑक्टोबरला भाजपचा राजीनामा दिला होता. “काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे” असं एकनाथ खडसे म्हणाले होते.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. “मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे” असं खडसे म्हणाले. पद मिळालं तरी काम करणार आणि नाही मिळाले तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात, खडसेंसह सर्वजण सुखरुप
राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे
भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे ‘अॅक्शन मोड’मध्ये, नेते-कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या बैठका सुरु
(Eknath Khadse reaction after Car Accident in Jalgaon)